Tuesday, January 24, 2023

कृषि विज्ञान केंद्र, खामगाव येथे ड्रोनचे प्रशिक्षण व प्रात्यक्षिक संपन्न

शेती करत असताना सध्याच्या वातावरणातील बदलामुळे पिकावर कीड व रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होताना दिसून येत आहे. कीड व रोगाचे व्यवस्थापनाकरिता शक्यतो शेतकरी पाठीवरील वापरणाऱ्या नॅप सॅक स्प्रेयर, एचटीपी पंप ई. चा वापर जास्तीत जास्त प्रमाणात करतात आणि हे करत असताना फवारणी करणारे शेतकरी किंवा शेतमजूर पहावी तेवढी स्वतःच्या शरीराची काळजी घेताना दिसत नाही. जसे त्यांना सांगण्यात आलेले आहे की कुठल्याही प्रकारची फवारणी करत असताना फवारणीचा गणवेश व तोंडावर मास्क, डोळ्यावर चष्मा इत्यादी चा वापर करणे आवश्यक असते तरीसुद्धा बहुतांश शेतकरी हे या बाबींकडे विशेष लक्ष देतांना दिसत नाही व बऱ्याच ठिकाणी जीवितहानीच्या घटना घडत असतात. त्यावर उपाय म्हणून शेतीसाठी ड्रोनचा वापर सध्याच्या काळात उपयुक्त ठरणार आहे. याच्या वापरामुळे मजुरांची, वेळेची, पैशाची बचत तर होतेच सोबतच ड्रोन द्वारे फवारणी केल्यामुळे ड्रोन वापरणाऱ्या किंवा शेतातील शेतकऱ्यांना याच्या वापरामुळे किंवा त्यातील असलेल्या फवारणीच्या औषधामुळे विपरीत परिणाम घडून येत नाही. शेतीतील ड्रोन वापरा विषयी जागृती व प्रसार करण्याकरिता  वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र, खामगाव येथे कृषि अभियांत्रिकी विभागामार्फत  "शेतीसाठी ड्रोनचा वापर" या विषयावर एक दिवसीय प्रशिक्षण व प्रात्यक्षिक कार्यक्रम दिनांक २४.०१. २०२३ रोजी घेण्यात आला.

या एक दिवशी कार्यक्रमाकरिता गरुडा एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, चेन्नई यांच्या कडून ड्रोन व पायलट यांची उपलब्धता करून देण्यात आली. सदरील कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून प्रा. दिप्ती पाटगावकर, कार्यक्रम समन्वयक, कृषि विज्ञान केंद्र, खामगाव, प्रमुख पाहुणे श्री. जेजुरकर, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी, बीड, प्रमुख उपस्थिती मध्ये श्री. वडकुते, तालुका कृषि अधिकारी, गेवराई, श्री. डींगरे, सरपंच, खामगाव, श्री. शिंदे, सरपंच, नागझरी हे लाभले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते भारताचे पहिले कृषि मंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून तसेच दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रशिक्षण व प्रात्यक्षिक कार्यक्रमांमध्ये ड्रोन विषयी विस्तृत अशी माहिती सोबतच त्याच्या वापराचे निकष यांच्या विषयी महत्वपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस केंद्रातील डॉ. तुकेश सुरपाम, विषय विशेषज्ञ, कृषी अभियांत्रिकी विभाग यांनी ड्रोन विषयी तांत्रिक माहिती व त्याच्या वापरा बद्दल सविस्तर असे मार्गदर्शन उपस्थित शेतकऱ्यांना दिले. तालुका कृषी अधिकारी श्री. वडकुते यांनी ड्रोनचा वापर भविष्यात जास्तीत जास्त क्षेत्रावर होणे गरजेचे आहे असे आपल्या मार्गदर्शनात सांगितले. पुढील मार्गदर्शनात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. जेजुरकर यांनी ड्रोन हे शेतीसाठी कसे फायदेशीर ठरणार आहेत व भविष्यात याच्या अनुदानाबद्दल कृषी विभाग जास्तीत जास्त प्रसार व प्रचार करणार असे प्रतिपादन केले. अध्यक्षनीय भाषणात कार्यक्रम समन्वयक प्रा. दिप्ती पाटगावकर यांनी ड्रोनचे शेतीतील वापर व त्यामुळे होणारे भविष्यातील फायदे याविषयी मार्गदर्शन केले. त्यानंतर केंद्राच्या प्रक्षेत्रावर असलेल्या हरभरा पिकामध्ये ड्रोन चे प्रात्यक्षिक देण्यात आले. प्रात्यक्षिक देतांना डॉ. सूरपाम यांनी उपलब्ध असलेल्या ड्रोन चे प्रकार, मॅनुअल व ऑटोमॅटिक सिस्टम, वापरण्याची पद्धत, ड्रोन वापरासाठी लागणारे प्रमाणपत्र, केंद्राकडून मिळणारे अनुदान व इतर मत्वाची माहिती उपस्थित शेतकरी, कृषि विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना दिली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कृषि विज्ञान केंद्र व कृषि विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment