Wednesday, February 22, 2023

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या २८ व्या दीक्षांत समारंभात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू मा प्रा. डॉ. इन्द्र मणि यांनी केले मार्गदर्शन

नाशिक – स्वयंअध्ययन साहित्याची गुणवत्ता अनेक वेळा सिद्ध झाली आहे. नोंदणीकृत विद्यार्थ्यांच्या घरापर्यंत स्वयंअध्ययन साहित्य पोहोचविण्याची तत्पर वितरण यंत्रणा, अभ्यास केंद्रांवर तज्ज्ञ समुपदेशकांकडून विद्यार्थ्यांचे योग्य समुपदेशन, प्रश्नपत्रिकांचे ऑनलाइन वितरण, मूल्यमापन, विद्यार्थ्यांची परीक्षेतील चांगली कामगिरी आणि राज्यभर विद्यापीठाने विकसित केलेली प्रशासकीय यंत्रणा, यामुळे विद्यापीठ स्वत:ची ओळख निर्माण करण्यात यशस्वी झाले आहे, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू मा प्रा. डॉ. इन्‍द्र मणि यांनी केले. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या २८ व्या दीक्षांत समारंभाचे आयोजन दिनांक २२ फेब्रुवारी रोजी करण्‍यात आले होते, समांरंभात मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.

मा डॉ इन्‍द्र मणि म्‍हणाले की , नवी शैक्षणिक धोरण २०२० ची बीजे खुल्या आणि दूरस्थ शिक्षण प्रणालीत दडलेली आहेत. या धोरणात अनेक चांगली वैशिष्ट्ये असली तरी कोणत्याही संस्थेची प्रगती त्याच्या अंमलबजावणीच्या दृष्टीकोनावर आणि त्या संस्थेच्या अद्वितीय सामर्थ्यावर अवलंबून असते. स्वयंअध्ययन साहित्य ही कोणत्याही मुक्त विद्यापीठाची खरी ताकद आणि कणा आहे.

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील यांनी विद्यापीठाने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व शैक्षणिक शिक्षणक्रमांमध्ये बदल करण्याची प्रक्रिया सुरू केल्याचे सांगितले. विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले होते, असेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाला व्यवस्थापन मंडळाचे सदस्य प्रा. डॉ. जयदीप निकम, प्रा. डॉ. अनिल कुलकर्णी, ‘सह्याद्री’ कृषी समुहाचे मुख्य संचालक विलास शिंदे आदी उपस्थित होते. प्रारंभी सर्व पाहुण्यांचे मिरवणुकीने मुख्य व्यासपीठाजवळ आगमन झाले. कुलसचिव तथा परीक्षा नियंत्रक भटूप्रसाद पाटील यांनी मानदंडसह या मिरवणुकीचे नेतृत्व केले. २०२३-२४ या शैक्षणिक वर्षापासून बहुतांश शिक्षणक्रम नव्या स्वरुपात दिले जाणार आहेत. अकॅडॅमिक बँक ऑफ क्रेडिटच्या (एबीसी) नोंदणीची प्रक्रिया विद्यापीठात सुरू आहे. आतापर्यंत चार लाख विद्यार्थ्यांची नोंद करण्यात आली आहे. मुक्त विद्यापीठाच्या पदवीप्रदान समारंभात पदविकाधारक २४५१८, पदव्युत्तर पदविकाधारक १२, पदवीधारक एक लाख १४ हजार ३२८, पदव्युत्तर पदवीधारक १६३६९, पीएच. डी धारक पाच तर, एम.फिलधारक दोन स्नातकांना पदवी प्रदान करण्यात आली.






 

No comments:

Post a Comment