Wednesday, February 1, 2023

मौजे गल्ले बोरगाव (ता खुलताबाद, जि. औरंगाबाद) येथे शेतीदिन साजरा

मौजे गल्‍ले बोरगाव शिवार बहरले वनामकृवि विकसित ज्‍वारी सुपर मोतीने

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या औरंगाबाद येथील विभागीय कृषी विस्‍तार शिक्षण केंद्र आणि जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय औरंगाबाद यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने आंतरराष्‍ट्रीय पौष्‍टीक तृणधान्‍य वर्षानिमित्‍त दिनांक ३१ जानेवारी रोजी मौजे गल्ले बोरगाव (ता खुलताबाद, जि. औरंगाबाद) येथील श्री ज्ञानेश्वर भगत यांच्या शेतावर शेतीदिन आणि विद्यापीठ संशोधीत रब्बी ज्वारीचा सुपर मोती पिक पाहणी कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते. कार्यक्रमास सहयोगी संशोधन संचालक डॉ सुर्यकांत पवार, खुलताबाद तालुका कृषी अधिकारी शिरीष घनबहादूर, विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्राचे रामेश्वर ठोंबरे, सरपंच विशाल खोसरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मार्गदर्शनात डॉ सुर्यकांत पवार म्‍हणाले की, परभणी कृषी विद्यापीठाने रब्‍बी ज्‍वारीचे अनेक चांगले वाण विकसित केले असुन सुपर मोती हा वाणाची शेतकरी मोठया प्रमाणात लागवड करित आहेत. या वाणाची ज्‍वारीचे उत्‍पादन आणि चाराचे उत्‍पादन दोन्‍ही चांगले असुन यामुळे ज्‍वारी खाण्‍याकरिता व चारा जनावरांकरिता दोन्‍ही गोष्‍टी साध्‍य होतात. येणा-या रब्‍बी हंमागात सुपर मोती ज्‍वारी लागवडी खालील क्षेत्र वाढी करिता प्रयत्‍न करू. येत्या रब्बीत गल्ले बोरगाव हे सर्वांच्या सहकार्याने सुपर मोतीचे करू, असे ते म्‍हणाले.

श्री रामेश्वर ठोंबरे म्हणाले की, मागील दोन वर्षी या गावात या वाणानी चांगले उत्पादन दिले म्हणून २०२२ रब्बी हंगामात विद्यापीठ निर्मित संशोधित ज्वारी सुपर मोती वाणाची मोठी मागणी शेतकऱ्यांनी केली होती.  तर तालुका कृषी अधिकारी शिरीष धनबहादूर म्हणाले की, गल्‍ले बोरगाव हे खुलताबाद तालुक्यातील हे एक महत्वाचे रब्बी ज्वारी पिकविणारे गाव असुन हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्षात या शिवारचे महत्व अधोरेखित होते.

गल्‍ले बोरगाव या गावात विद्यापीठ संशोधित सुपरमोती वाणाची ५० एकर क्षेत्रावर लागवड केलेली असुन या शिवाय कृषी विभागाच्या वतीने पीक प्रात्यक्षिकेही देण्यात आलेली आहे, यात ज्वारीचा इतर वाणाचा समावेश आहे. संपुर्ण शिवारात रब्‍बी ज्‍वारीचे पिक सध्‍या चांगलेच बहरात असुन यात सुपरमोती वाणाची वाढ चांगली आहे. यावेळी उपस्थित मान्‍यवर व शेतकरी बांधवांनी विविध ज्‍वारीच्‍या प्रात्‍यक्षिक प्रक्षेत्रास भेट दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री एस बी धबाले यांनी केले तर आभार श्याम खोसरे यांनी मानले. प्रगतशील शेतकरी तुळशीराम औटे, किशोर खोसरे, श्याम खोसरे, पांडुरंग वेताळ, संतोष चंद्रटिके, कारभारी ठेंगडे यांच्यासह  सुपरमोती या वाणाची लागवड करणारे शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी ज्ञानेश्वर मित्रमंडळ व ग्रामस्‍थांनी परिश्रम घेतले.


No comments:

Post a Comment