भित्तीपत्रकांचे अनावरण, स्वच्छता अभियान आणि पर्यावरण जागृतीचे मार्गदर्शन
वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठ, परभणी अंतर्गत कार्यरत असलेल्या शासकीय कृषि महाविद्यालय आणि कृषि व्यवसाय
व्यवस्थापन महाविद्यालय, जिरेवाडी परळी-वैजनाथ येथे जागतिक
पर्यावरण दिन अत्यंत उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला.
यानिमित्ताने भित्तीपत्रक अनावरण, महाविद्यालयीन परिसर
स्वच्छता मोहीम, पर्यावरण जागृतीपर व्याख्यान आदी उपक्रमांचे
आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले ते वैद्यनाथ महाविद्यालयाचे
भूगोल विषयाचे सेवानिवृत्त प्राध्यापक प्रा. दासू वाघमारे यांचे सखोल आणि मन
हेलावून टाकणारे मार्गदर्शन. त्यांनी पर्यावरणाच्या सद्यस्थितीचे चिंताजनक वास्तव
मांडत,
होत असलेल्या ऱ्हासाचे भीषण परिणाम, वाढती
नैसर्गिक आपत्ती, हवामानातील असंतुलन आणि मानवी
हस्तक्षेपामुळे निर्माण झालेले संकटे यावर अत्यंत अभ्यासपूर्ण आणि प्रभावी भाष्य
केले.
"आजचा विद्यार्थी हा उद्याच्या हरित क्रांतीचा वाहक असून, त्याला पर्यावरण रक्षणासाठी सज्ज करणे ही काळाची गरज आहे," असे सांगत त्यांनी उपस्थित तरुणांमध्ये पर्यावरण संवर्धनाची ठिणगी चेतवली.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे सहयोग अधिष्ठाता व
प्राचार्य डॉ. दिनेशसिंग चौहान यांनी भूषवले. आपल्या भाषणात त्यांनी प्लास्टिकच्या
दुष्परिणामांवर जोरदार प्रहार करत, प्लास्टिक मुक्त
जीवनशैलीचे महत्व पटवून दिले. पर्यावरण संवर्धनासाठी सर्वांनी मिळून जबाबदारीने
काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.
विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या भित्तीपत्रकांमधून पर्यावरण
रक्षणाचे ज्वलंत संदेश देण्यात आले. परिसरातील प्लास्टिक कचरा गोळा करून
विद्यार्थ्यांनी 'प्लास्टिक मुक्त परिसर' या संकल्पनेची शपथ घेतली, ही बाब विशेष उल्लेखनीय
ठरली.
कार्यक्रमाचे संयोजन आणि सूत्रसंचालन प्रा. बाबासाहेब मस्के
यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये कार्यालयीन अधीक्षक श्री. अनंत
मुंडे,
कर्मचारी श्री. पांचाळ, श्री. उदय चौहान,
श्री. धोत्रे, श्री. वाकडे, श्री. कांबळे यांचे आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे मोलाचे योगदान
लाभले.
हा कार्यक्रम केवळ औपचारिक उत्सव न राहता, पर्यावरण रक्षणासाठी सजगतेची आणि सामूहिक जबाबदारीची साद ठरला, हे विशेष!


.jpeg)
No comments:
Post a Comment