Friday, December 23, 2022

शेतकरी बापलेकाच्या चेहऱ्यावरील आनंद हा विद्यापीठासाठी प्रेरणादायी …… शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले

मौजे शंकरपुर (ता गंगापुर जि औरंगाबाद) येथे तूर शेतीदिन साजरा

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील औरंगाबाद येथील विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्र आणि गंगापूर तालुका कृषी अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २२ डिसेंबर रोजी मौजे शंकरपूर ता गंगापूर येथील तरुण प्रगतशील शेतकरी अभंग शेवाळे यांच्या शेतात विद्यापीठ विकसित तूर वाण - गोदावरी शेतीदिन संपन्न झाला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्‍हणुन शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले हे होते तर विभागीय कृषी सहसंचालक डॉ डी एल जाधव, राष्‍ट्रीय कृषि संशोधन प्रकल्‍पाचे प्रमुख डॉ सूर्यकांत पवार, बदनापूर येथील कृषी संशोधन केंद्राचे कडधान्य पैदासकार डॉ दीपक पाटील, हिमायतबाग फळ संशोधन केंद्रोच डॉ एम बी पाटील, संचालक विस्‍तार डॉ तुकाराम मोटे, अधिक्षक कृषि अधिकारी श्री उमेश घाटगे, प्राचार्य डॉ एस डी बटेवाड, डॉ सचिन मोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मार्गदर्शनात डॉ धर्मराज गोखले म्हणाले की, मला या चांगल्या संशोधनाचा शेतकरी बांधवांच्या शेतात तूर पीक पाहून आनंद होत आहे विद्यापीठाचे संशोधन कितीही चांगले असले तरी जो पर्यन्त ते शेतकरी बांधवाच्या शेतात बहरणार नाही तो पर्यंत त्याचा उपयोग नाही वसंतराव नाईक  मराठवाडा कृषी विद्यापीठ या भागापासून दूर असले तरी येथील कार्यरत कृषी विद्यापीठाच्या शास्रज्ञाचे आणि कृषी विभागाचे एकत्रित उत्तम कार्य हे शेतकरी बांधवांसाठी नक्कीच बळ निर्माण करणारे आहे मराठवाड्यात औरंगाबाद जिल्ह्याची कृषीविस्तार सेवा ही उल्लेखनीय आहे या संशोधना सोबत मला शेवाळे पितापुत्र यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून अत्यानंद झाला आहे हे शेतकरी पितापुत्र इतर शेतकरी बांधवाना नक्कीच शेती करण्यासाठी आदर्श आहेत.

विभागीय कृषी सहसंचालक डॉ डी एल जाधव म्हणाले की या तूर पिकाचे क्षेत्र पाहून अतिवृष्टीत ही पीक नक्कीच वाचवू शकतो हा संदेश अभंग शेवाळे यांनी दिला आहे सतत नवनवीन प्रयोग आपल्या शेतात प्रभावीपणे राबविण्यात हे माहीर आहेत  कृषी संशोधन केंद्र बदनापूर निर्मित गोदावरी वान हा येत्या काळात नक्कीच विस्तारल्या शिवाय राहणार नाही.

डॉ एम बी पाटील यांनी सद्यस्थितीत मोसंबी पिकाचे आंबेबहर व्यवस्थापन तंत्रज्ञान सांगितले ताण धरण्याचा कालावधी त्यानंतर पाणी नियोजन खत नियोजन केल्यास हे फळ पीक शेतकऱ्यांना समृद्ध केल्याशिवाय राहणार नाही आता मृग बहराची फळे काळी दिसत आहे हे काळेपणा कोळी या किटकामुळे प्रादुर्भाव झाला आहे यासाठी वेळेवर गंधकयुक्त कीटकनाशके फवारले तर याचा बंदोबस्त नक्कीच होतो आंध्रप्रदेश मधील सातगुडी बागा नाहीशा झाल्या आहेत त्यामुळे आपल्या भागातील शेतकऱ्यांना अधिक पैसे मिळविण्याची संधी उपलब्द झाली आहे याचा विचार करून बागेचे व्यवस्थापन उत्तम करत अधिक उत्पादनाची कास धरावी असे आवाहन केले.

डॉ दीपक पाटील म्हणाले की, औरंगाबाद विभागात जवळपास ऐंशी टक्के वाण पांढऱ्या रंगाची तूर शेतकरी बांधव लागवड करतात, याचा विचार करून आणि अधिक उत्पादनक्षम वाण विकासावर बदनापुर कृषी संशोधन केंद्राने भर दिला आहे. भारी जमीन आणि सिंचन व्यवस्था असेल तर शेतकरी बांधवानी गोदावरी या वाणाची लागवड करावी. गेली आठ वर्षांपासून या केंद्राने विकसित केलेला बिडीएन ७११ हा वाण शेतकरी बांधवात मोठा प्रचलित आहे.

डॉ सूर्यकांत पवार म्हणाले की, वारंवार एकच पीक घेणे हे जमीन आणि शेतकरी या दोन ही घटकासाठी फायदेशीर नसते. तूर राज्यातील महत्वाचे आणि खात्रीचे उत्पादन देणारे पीक असुन मागील पाच वर्षापासून कृषी विद्यापीठ व कृषी विभागाच्या वतीने प्रयत्न केला जात आहे. जिल्ह्यात अनेक शेतकरी आता हे तूर उत्पादक शेतकरी म्हणून ओळखल्या जात आहे हेच संशोधनाचे यश आहे.

किटकशास्‍त्रज्ञ डॉ नितीन पतंगे यांनी तूर पिकावर येणारी कीड आणि व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन केले आणि औरंगाबाद येथील राष्‍ट्रीय कृषि संशोधन प्रकल्‍पाच्‍या वतीने निर्मित ट्रायकोकार्ड यांची माहिती दिली. कार्यक्रमात तूर उत्पादक शेतकरी अभंग  शेवाळे यांनी तूर गोदावरी लागवडीपासून आज पर्यंत काय पीक व्यवस्थापन तंत्रज्ञान राबविले याची माहिती दिली. प्रास्तविक विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्राचे रामेश्वर ठोंबरे यांनी केले. सूत्रसंचालन संजीव साठे पाटील यांनी केले तर आभार तालुका कृषी अधिकारी गंगापूर ज्ञानेश्वर तारगे यांनी मानले. कार्यक्रमास शेतकरी बांधव मोठया संख्‍येने उपस्थित होते.


सौजन्‍य - रामेश्वर ठोंबरे, विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्र औरंगाबाद

No comments:

Post a Comment