मौजे तिडका (ता सोयागाव जि छत्रपती संभाजीनगर) येथील शेतकरी बांधव श्री ईश्वर सपकाळ यांच्या शेतात वनामकृवि विकसित बाजरीचे वाण एएचबी-१२००एफई (AHB 1200Fe) चांगलाच बहरले आहे. सन २०२३ हे वर्ष जागतिक भरड धान्य वर्ष म्हणुन साजरे केले जात असुन बाजरी हे भरड धान्यातील महत्वाचे पिक आहे. बाजरी पिकांमध्ये वनामकृवि आणि इक्रीसॅट संस्था हैदराबाद यांच्या संयुक्त विद्यमाने विकसित बायोफोर्टिफाइड - जैवसंवर्धीत बाजरीचे वाण एएचबी-१२००एफई (AHB-1200Fe) आणि एएचबी-१२६९ (AHB-1269) या वाणात इतर सामान्य वाणापेक्षा लोह व जस्ताचे प्रमाण अधिक आहे. सर्वसामान्य वाणात लोहाचे ४५ ते ५० पीपीएम व जस्ताचे ३० ते ३५ पीपीएम असते, परंतु एएचबी-१२००एफई वाणात लोहाचे प्रमाण ८८ पीपीएम असुन जस्ताचे प्रमाण ४३ पीपीएम आहे तर एएचबी-१२६९ मध्ये लोहाचे प्रमाण ६१ पीपीएम व जस्ताचे ४३ पीपीएम आहे. यामुळे या वाणाचा मानवी आहारात उपयोग केल्यास कुपोषण, रक्तक्षय व बालमृत्यु टाळण्यासाठी होऊ शकतो. तसेच हे वाण गोसावी व करपा रोगास प्रतिकारक आहे. उत्पादन क्षमता एकरी १२ क्विंटल आहे.
No comments:
Post a Comment