Friday, February 7, 2025

सावरगाव (हडप) येथे कापूस पिकाच्या उत्पादनवाढीसाठी विशेष शेतकरी मेळावा संपन्न

अधिक नफ्यासाठी विक्री व्यवस्थापनाची कला शेतकऱ्यांनी आत्मसात करावी... माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि


भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या नागपूर येथील केंद्रीय कापूस संशोधन संस्था आणि खरपुडी (जालना) येथील कृषि विज्ञान केंद्र-१ यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष कापूस प्रकल्पांतर्गत दिनांक ७ फेब्रुवारी रोजी कापूस पिकाच्या उत्पादनवाढीसाठी शेतकरी मेळाव्याचे आयोजन मौजे सावरगाव (हडप), जालना येथे करण्यात आले. या मेळाव्याचे उद्घाटन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या हस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठवाडा शेती सहाय्य मंडळाचे सचिव, कृषि रत्न माननीय श्री विजय अण्णा बोराडे उपस्थित होते. यावेळी विस्तार शिक्षण संचालक डॉ. गिरधारी वाघमारे, केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे संचालक डॉ. वाय. जी. प्रसाद, केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे संशोधन समिती सदस्य व सल्लागार श्री दादा लाड, कृषि उपसंचालक श्री कायंदे, विशेष कापूस प्रकल्पाचे नोडल अधिकारी डॉ. अर्जुन तायडे, शास्त्रज्ञ डॉ. सुनील महाजन, कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. एस. व्ही. सोनुने आदींची प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी उद्घाटनपर भाषण करताना शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराचे महत्त्व सांगितले. ते म्हणाले, "उत्कृष्ट शेतीमधूनच भविष्यातील विकसित भारताचे स्वप्न पूर्ण होईल. शेतकऱ्यांसाठी कार्य करण्याची ईश्वरीय शक्ती आपल्याला मिळालेली आहे. विद्यापीठ ‘शेतकरी देवो भव:’ या भावनेतून कार्य करत आहे." त्यांनी पुढे सांगितले की, शेतीमध्ये उत्पादकतेपेक्षा आर्थिक नफा किती झाला याकडे लक्ष द्यावे लागेल. तसेच, अधिक नफा मिळवण्यासाठी विक्री व्यवस्थापनाची कला शेतकऱ्यांनी आत्मसात करावी. महाराष्ट्रातील कृषि विकासासाठी दूरदर्शी धोरणे आवश्यक असून, कै. वसंतरावजी नाईक यांनी हवामान विभागानुसार चार कृषि विद्यापीठांची स्थापना करून शेती क्षेत्राला मोठी चालना दिली. त्यामुळे कृषि शिक्षण आणि मनुष्यबळाचा विकास घडून आला. कृषि शिक्षण क्षेत्राला उद्योगांशी जोडण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.

या मेळाव्यात विविध मान्यवरांनी मार्गदर्शन केले. हा शेतकरी मेळावा अत्यंत यशस्वी झाला असून, शेतकऱ्यांनी या माध्यमातून कापूस शेतीबाबत महत्त्वाची माहिती आणि आधुनिक तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन मिळवले.


Monday, February 3, 2025

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांची सोमनाथपूर कृषि संशोधन केंद्रास भेट: संशोधन विस्तारास महत्त्वपूर्ण दिशा

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या सोमनाथपूर (ता. उदगीर) येथील कृषि संशोधन केंद्राला माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी दिनांक ३ फेब्रुवारी रोजी भेट दिली. या प्रसंगी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. खिजर बेग आणि  लातूर येथील गळीत धान्य संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. मोहन धुप्पे यांची उपस्थिती होती.

यावेळी माननीय कुलगुरूंनी करडई व ज्वार संशोधन प्रयोग तसेच हरभरा पिकाच्या बीजोत्पादनाची प्रत्यक्ष पहाणी केली. संशोधन केंद्राच्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी संशोधनाच्या भविष्यातील दिशेबाबत महत्वपूर्ण सूचना केल्या. या केंद्राला गळीत धान्य संशोधन केंद्राशी सलग्न करून सूर्यफुल बियाणे उत्पादनासाठी 'सूर्यफुल सिड हब' उभारून शेतकऱ्यांना अधिकाधिक दर्जेदार बियाणे उपलब्ध करून द्यावे. केंद्रातील उपलब्ध जमिनीवर फळ पिकांची लागवड, याबरोबरच परिसरातील शेतकऱ्यांना लाभ होण्याच्या दृष्टीने भाजीपाला व फळपिकांच्या रोपवाटिकेची उभारणी करण्यास सांगितले.

प्रभारी अधिकारी श्री सुधीर सुर्यवंशी यांनी संशोधन केंद्रात सुरू असलेल्या विविध संशोधन प्रकल्पांची माहिती सादर करून मान्यवरांचे आभार मानले. माननीय कुलगुरूंच्या भेटीचे यशस्वी आयोजनसाठी  श्री भ. ह. कांबळे, श्री अमोल सुनेवाड, श्री चंद्रकांत चव्हाण आणि श्री वाघमारे यांनी विशेष परिश्रम घेतले.




वनामकृविचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांची हंडरगुळी (ता.उदगीर) करडई पीक प्रात्यक्षिकास भेट

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या लातूर येथील अखिल भारतीय तेलबिया संशोधन संस्थे अंतर्गत मौजे हंडरगुळी (ता.उदगीर) घेण्यात आलेल्या करडई पीक प्रात्यक्षिकास माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी दिनांक 3 फेब्रुवारी भेट दिली. त्यांच्यासमवेत विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. खिजर बेग व लातूर येथील गळीत धान्य संशोधन केंद्राचे प्रभारी डॉ. मोहन धुप्पे, सरपंच श्री ज्ञानेश्वर गायकवाड, करडई उत्पादक तथा प्रगतशील शेतकरी श्री सतीश काळे, श्री कल्याण पाटील, श्री विजय आंबेकर आदी उपस्थित होते.

यावेळी माननीय कुलगुरू यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि करडई उत्पादनाचे महत्व सांगितले. शेतकऱ्यांनी अवलंबलेल्या आंतरपीक पद्धतीचेही त्यांनी कौतुक केले. याबरोबरच दर मंगळवारी आणि शुक्रवारी सायंकाळी ७.०० वाजता नियमित सुरु असलेल्या विद्यापीठाच्या ऑनलाइन शेतकरी - शास्त्रज्ञ कृषि संवाद कार्यक्रमामध्ये सहभागी होवून माहिती घेण्याचा आणि शास्वत शेतीसाठी विद्यापीठ विकसित तंत्रज्ञान आणि कृषि सल्ला अवलंबन करण्यासाठी प्रोत्साहन दिले.  भेटी दरम्यान हंडरगुळी गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





पदव्युत्तर कृषि व्यवसाय व्यवस्थापन संस्थेचा ब्रँड तयार करावा !... माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या चाकूर स्थित पदव्युत्तर कृषि व्यवसाय व्यवस्थापन या संस्थेस माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि  यांनी दिनांक ३ फेब्रुवारी रोजी भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. खिजर बेग व लातूर येथील गळीत धान्य संशोधन केंद्राचे प्रभारी डॉ. मोहन धुप्पे उपस्थित होते.

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि  यांनी  महाविद्यालयातील शैक्षणिक, संशोधनात्मक आणि विस्तार कार्याचा आढावा घेतला. या पदव्युत्तर संस्थेतून अभ्यास करणारे विद्यार्थी भविष्यात उद्योजक म्हणून पुढे आले पाहिजेत. यासाठी विद्यार्थ्यांनी कृषि मालाचे उत्पादन व्यवस्थापन आणि वितरण व्यवस्थापन यामध्ये प्राविण्य मिळवायला हवे. त्या अनुषंगाने संस्थेकडे उपलब्ध असलेल्या जमिनीवर फळ पिकांची लागवड करावी. तसेच फळ उत्पादन आणि प्रक्रिया पदार्थ वितरित करून संस्थेचा ब्रँड तयार करावा. हे कार्य विद्यार्थ्यांद्वारे करून घ्यावे व त्यांना अनुभवातून शिक्षण द्यावे. याबरोबरच खर्चामध्ये बचत होण्याच्या दृष्टीने संस्थेमध्ये सौर ऊर्जेद्वारे वीज निर्मिती यंत्रणा बसवावी. या बचतीचा लाभ विद्यार्थ्यांना द्यावयाच्या सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी वापरावा असे सूचित केले.

अधिष्ठाता डॉ. संतोष कांबळे यांनी संस्थेतील उपक्रमांची माहिती सादर करून मान्यवरांचे आभार मानले.




Saturday, January 25, 2025

"कृषी व्यवसायाला समृद्ध करण्यासाठी दुग्ध व्यवसायाची महत्त्वाची भूमिका"- कुलगुरू मा. प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

 आदर्श एनसीसीच्या वतीने कुलगुरू मा. प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचे स्वागत


हिंगोली येथील आदर्श शिक्षण संस्थेचे कला, वाणिज्य विज्ञान महाविद्यालयात प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान (PM-USHA) पुरस्कृत दुग्धशास्त्र विभागाच्या वतीने दिनांक २५ जानेवारी २०२५ रोज शनिवारला "सस्टेनेबल डेअरी डेव्हलपमेंट इन इंडिया" या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. सदरील चर्चासत्राला अध्यक्ष म्हणून आदर्श शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. श्री कमलकिशोरजी काबरा हे उपस्थित होते तसेच सन्माननीय संस्था सदस्य मा. श्री शिवप्रसाद काबरा मा. श्री रमेशचंद्रजी मुंदडा उपस्थित होते. चर्चासत्राचे उद्घाटक म्हणून वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी येथील कुलगुरू मा. प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे उपस्थित होते. प्रमुख बीजभाषक म्हणून जबलपूर येथील जवाहरलाल नेहरू कृषी विश्वविद्यालयातील शास्त्रज्ञ डॉ. राजेंद्र सिंह ठाकुर हे उपस्थित होते.

उद्घाटकीय भाषणात कुलगुरू मा. प्रा. (डॉ.) इन्द्र मणि म्हणाले की, ही भूमी संत आणि महंताची भूमी असून संस्कृती प्रधानभूमी आहे. येथील कृषी व्यवसाय श्रेष्ठ आहे तसेच हे क्षेत्र 'सिल्क आणि मिल्क' साठी महत्त्वाचे आहे असे सांगून या चर्चासत्रामधील मिळवलेल्या ज्ञानाचा फायदा मराठवाड्यासोबतच महाराष्ट्राच्या विकासासाठी निश्चितच होईल असे मत व्यक्त करताना कृषी व्यवसायाला समृद्ध करण्यासाठी दुग्ध व्यवसायाची महत्त्वाची भूमिका आहे हे प्रतिपादन केले. परिसंवादाच्या बीज भाषणातून डॉ. राजेंद्र सिंह ठाकूर यांनी कृषी,आरोग्य, संस्कृती, पर्यावरण यावर आपले महत्त्वपूर्ण विचार मांडले. तसेच शाश्वत विकासाची ध्येय गाठण्यासाठी दुग्ध व्यवसायाच्या विकासाला चालना देणे गरजेचे आहे असे विचार मांडले.

अध्यक्ष मा. श्री कमलकिशोरजी काबरा यांनी सहभागी संशोधकांना आपल्या भाषणातून शुभेच्छा दिल्या. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. विलास आघाव यांनी चर्चासत्राच्या उत्स्फूर्त सहभागींचे स्वागत करत महाविद्यालयाची भूमिका स्पष्ट केली. हे महाविद्यालय सतत नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी आग्रही असते असे मत व्यक्त केले.

सदरील चर्चासत्राचे प्रास्ताविक दुग्धशास्त्र विभाग प्रमुख चर्चासत्राचे समन्वयक प्रो. डॉ. पांडुरंग गंगासागरे यांनी केले. उद्घाटकीय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणित विभाग प्रमुख डॉ. सचिन हाटकर यांनी केले तर आभार प्रदर्शन संयोजन सचिव डॉ. प्रशांतकुमार जोशी यांनी केले.

राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या भेटीदरम्यान वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाचे कुलगुरू मा. प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांना आदर्श एनसीसी विभागाच्या वतीने गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला .याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विलास आघाव यांनी स्वागत केले, याप्रसंगी उपप्राचार्य प्रा. रमेश दळवी, एनसीसी विभाग प्रमुख मेजर पंढरीनाथ घुगेडॉ. सोपानदेव खरात     एनसीसी विद्यार्थी उपस्थित होते.

चर्चासत्राच्या समारोप समारंभाचे अध्यक्षस्थानी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या पशुसंवर्धन दुग्ध शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ गजेंद्र लोंढे हे होते. त्यांच्या हस्ते या कार्यक्रमातील भित्तिपत्रक प्रदर्शनातील विजेत्यांना स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. चर्चासत्रास पशुसंवर्धन आणि दुग्धशास्त्र विभागातील डॉ पी. व्ही पडघन, डॉ शंकर नरवाडे, डॉ एन एस कांबळे, डॉ आर पाटील यांच्यासह पदव्युत्तर आणि आचार्य पदवीचे सर्व विद्यार्थी सहभागी झाले होते.

सदरील चर्चासत्राच्या यशस्वी नियोजनासाठी दुर्दशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख संयोजक प्रो. डॉ. पांडुरंग गंगासागरे, IQAC समन्वयक डॉ. सचिन पत्की, PM USHA समन्वयक प्रा. अमजदखान पठाण, ऑर्गनायझिंग सेक्रेटरी डॉ. प्रशांतकुमार जोशी, को-कन्वेनर डॉ. एस. पी. शिंदे, कार्यालयीन अधीक्षक दिलीप दुबे, कैलास डिडाळे तसेच महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. याप्रसंगी महाराष्ट्र महाराष्ट्र बाहेरील एकूण १३८ संशोधक, अभ्यासक विद्यार्थी उपस्थित होते.