Tuesday, January 9, 2024

नारळ विकास मंडळ, ठाणे तथा कृषि विज्ञान केंद्र खामगाव चा उपक्रम

जिल्हास्तरीय शेतकरी कार्यशाळा संपन्न

गेवराई : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र खामगाव ता. गेवराई तसेच नारळ विकास मंडळ ठाणे कृषि मंत्रालय भारत सरकार यांच्या संयुक विद्यमाने एकदिवसीय जिल्हास्तरीय शेतकरी कार्यशाळा दिनांक ९ जानेवारी रोजी कृषि विज्ञान केंद्र खामगाव येथे संपन्न झाली. या कार्यशाळेला डॉ. दिप्ती पाटगावकर कार्यक्रम समन्वयक केव्हीके खामगाव या अध्यक्षस्थानी होत्या, सदरील कार्यक्रमाचे  उद्घाटन गेवराई चे तहसीलदार श्री संदीप खोमणे यांच्या हस्ते झाले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून नारळ विकास मंडळ ठाणे चे  उपसंचालक श्री रविंद्र कुमार सिंग, डॉ प्रदीप सांगळे, विषय विशेषज्ञ पिकसंरक्षण केव्हीके दिघोळअंबा तसेच डॉ. हनुमान गरुड, विषय विशेषज्ञ कृषिविद्या हे लाभले होते. प्रमुख उपस्थिती म्हणून श्री धोंडीराम डिंगरे सरपंच खामगाव व श्री सतीश केजभट मंडळ कृषि अधिकारी गेवराई यांची लाभली होती. सुरवातीला उद्घाटनिय भाषणात तहसिलदार श्री संदीप खोमणे यांनी नारळ लागवड तंत्रज्ञान कार्यशाळा आयोजित केल्याबद्दल आनंद व्यक्त केला आपल्याभागात नारळ लागवडीबाबत शेतकऱ्यांना जागरूकता निर्माण व्हावी यासाठी हा स्तुत्य उपक्रम असून याबद्दल कौतुक केले. यानंतर मुख्य मार्गदर्शक श्री रवींद्रकुमार यांनी शास्त्रीय पद्धतीने नारळ लागवडीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले यामध्ये जमिनीची निवड, लागवडीसाठी खड्डा नियोजन, नारळाच्या विविध वाणांची निवड, खतव्यवस्थापन त्याचबरोबर कीड व रोग व्यवस्थापन आणि त्यावरील उपाययोजना याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. नारळ लागवडीबाबत शासनाच्या योजना याबद्दल माहिती दिली. त्यानंतर डॉ प्रदीप सांगळे यांनी फळबाग पिक संरक्षण तसेच रब्बी हंगामातील पिकाबद्दल सद्यपरिस्थीत करावयाच्या उपाययोजना याबद्दल उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. डॉ हनुमान गरुड यांनी पाणी व्यवस्थापन या विषयी मार्गदर्शन केले. आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात डॉ. दीप्ती पाटगावकर यांनी केव्हीके खामगाव तर्फे चालू असलेल्या विविध उपक्रमांची उपस्थित शेतकऱ्यांना माहिती दिली. तसेच नारळापासून तयार केल्या जाणाऱ्या सर्व पदार्थांची माहिती देऊन  नारळ प्रक्रिया संधी आणि नारळाचे आहारातील महत्व या विषयावर सविस्तर माहिती दिली. यानंतर उपस्थित शेतकऱ्यांच्या नारळ लागवडीबाबत असणाऱ्या शंकांचे निरसन केले. शेवटी डॉ तुकेश सुरपाम यांनी उपस्थित सर्वांचे आभार व्यक्त केले. यानंतर कृषि विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावरील नारळ पिकास आळे करण्याची शास्त्रीय पद्धती, तसेच खत आणि पाणी व्यवस्थापन संबंधी प्रात्येक्षिकाद्वारे उपस्थित शेतकऱ्यांना  मार्गदर्शन केले. विशेष म्हणजे या कार्यक्रमात शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक, शेतकरी, धान फाउंडेशन, महिला बचत गट महिला व होतकरू शेतकरी यांची उपस्थिती होती त्यांनी नारळ लागवड विषयी  सखोल चर्चा केली.  या कार्यक्रमाला १०० हुन अधिक शेतकरी व शेतकरी महिला उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी श्री. गिरीष कुमार पाल, श्री. कुंडलिक वाव्हळ, श्री. दत्तप्रसाद वीर, श्री सुधाकर काटे यांनी अथक परिश्रम घेतले.




No comments:

Post a Comment