Tuesday, September 26, 2023

विद्यार्थ्‍यांनी परिश्रमात चिकाटी व सातत्‍य ठेवल्‍यास यश प्राप्‍त होतेच ..... कुलगुरू मा डॉ. इन्‍द्र मणि

वनामकृविच्‍या बदनापूर कृषी महाविद्यालयात नुतन प्रवेशित विद्यार्थ्‍यांचा अभिमुखता कार्यक्रम व विद्यार्थी पालक मेळावा संपन्न

विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करून त्याच्या संपादनासाठी परिश्रमामध्ये चिकाटी व सातत्य ठेवणे आवश्यक आहे. विद्यार्थ्‍यांनी महाविद्यालयीन जीवनाचा सदोपयोग यश संपादन करण्यासाठी करून घ्यावा, असा सल्‍ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ. इन्‍द्र मणि यांनी केले.

विद्यापीठांतर्गत बदनापुर येथील कृषी महाविद्यालयात दिनांक २५ सप्टेंबर प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित अभिमुखता कार्यक्रम व विद्यार्थी पालक मेळाव्याच्‍या अध्यक्षस्‍थानावरून ते बोलत होते.

कुलगुरू मा डॉ. इन्‍द्र मणि पुढे म्हणाले की, पालकांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक क्षेत्र निवडतांना आपल्‍या पाल्‍यास स्वातंत्र्य द्यावे, अभ्यासक्रमाच्या बाबत जागरूक राहावे. कृषी महाविद्यालय, बदनापूर व विद्यापीठ नेहमीच शैक्षणिक सुविधांसोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे ते म्‍हणाले. यावेळी त्‍यांनी कृषी पदवीच्या शिक्षणानंतर विद्यार्थ्यांना उपलब्ध असलेल्या विविध संधीबाबत पण कुलगुरूंनी विद्यार्थ्यांना अवगत करून दिले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविककात सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ. राकेश अहिरे महाविद्यालयाबद्दल माहिती देऊन विद्यार्थ्याच्या शैक्षणिक प्रगतीसाठी पुढील काळात नवनवीन उपक्रम राबवून शिक्षणाचा दर्जा उंचाविण्यासाठी हे महाविद्यालय प्रयत्‍नशील राहील अशी ग्वाही यांनी दिली.

यावेळी महाविद्यालयात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती असलेली ध्वनीचित्रफीत सादर करण्यात आली. शिक्षण विभाग प्रभारी डॉ. अर्चना चौधरी यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक नियमावलीबद्दल माहिती दिली त्यानंतर बी.एससी. कृषीच्या प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या नवीन विद्यार्थ्यांचे व पालकांचे महाविद्यालयातर्फे स्वागत करण्यात आले. महाविद्यालयातील प्राध्यापकांचा उपस्थितांना परिचय करून देण्यात आला.

यावेळी माननीय कुलगुरू यांच्‍या हस्‍ते नुतनीकृत जिजाऊ मुलींचे वसतीगृहाचे उदघाटन करण्‍यात आले. कार्यक्रमास संचालक शिक्षण तथा अधिष्ठाता (कृषी) डॉ. उदय खोडके, विद्यापीठ अभियंता श्री. दीपक कशाळकर, औरंगाबाद येथील राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाचे सहयोगी संचालक संशोधन डॉ. सूर्यकांत पवार, कृषी संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. किरण जाधव, मोसंबी संशोधन केंद्र बदनापूरचे प्रभारी अधिकारी डॉ. संजय पाटील, कृषी विज्ञान केंद्र बदनापूरचे प्रभारी अधिकारी डॉ. सचिन सोमवंशी, विद्यार्थी पालक प्रतिनिधी सांडू लोखंडे आदीसह कृषी महाविद्यालयाचे प्राध्यापक, अधिकारी व कर्मचारी, विद्यार्थी व त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.






No comments:

Post a Comment