Friday, May 5, 2023

वनामकृविच्‍या लातुर येथील कृषि महाविद्यालयातील अनुसुचित जाती लाभार्थी मुलींच्‍या वसतीगृहाचे माननीय कृषिमंत्री मा ना श्री अब्‍दुल सत्‍तार यांच्‍या हस्‍ते उदघाटन


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या लातुर येथील कृषि महाविद्यालयाच्‍या नुतन बांधकाम केलेले अनुसुचित जाती लाभार्थी मुलींच्‍या वसतीगृहाचे उदघाटन दिनांक १ मे रोजी महाराष्‍ट्र दिनी राज्‍याचे माननीय कृषीमंत्री मा ना श्री अब्‍दुल सत्‍तार यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि हे होते तर व्‍यासपीठावर प्रमुख अतिथी म्‍हणुन हिंगोली लोकसभा मतदार संघाचे खासदार मा श्री हेमंतजी पाटील, माजी विधानसभा सदस्‍य मा श्री पाशा पटेल, माजी विधानसभा सदस्‍य डॉ दिलीपराव देशमुख, लातुरचे जिल्‍हाधिकारी मा श्री बी पी पृथ्‍वीराज, शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, कुलसचिव डॉ धिरजकुमार कदम, सहयोगी अधिष्‍ठाता डॉ गजेंद्र लोंढे, विद्यापीठ उपअभियंता डॉ देवानंद टेकाळे, आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी महाविद्यालयाच्‍या विद्यार्थी-विद्यार्थींनीनी सां‍स्‍कृतिक कार्यक्रमात नृत्‍य व कला सादर केल्‍या.

मार्गदर्शनात मा ना श्री अब्‍दुल सत्‍तार म्‍हणाले की, शेती विकासाकरिता कृ‍षि विषयाचा शालेय अभ्‍यासक्रमात समावेश करण्‍यात आला असुन देशातील महाराष्‍ट्र हे पहिले राज्य आहे. शेतक-यांचे अपघात विम्‍याचे प्रलंबीत प्रकरणे तात्‍काळ निकाली काढण्‍यात येतील. शेतक-यांना उच्‍च दर्जाचे बियाणे, खते यांचा कोठेही तुटवडा पडु दिला जाणार नाही असे आश्‍वासन देऊन परभणी कृषी विद्यापीठ बीजोत्‍पादनाकरिता १००० एकर जमिनवर वहितीखाली आणली असल्‍याबाबत कौतुक केले. तसेच प्रत्‍येकी तीनशे विद्यार्थ्‍याकरिता एक असे एकुण दोन मुलांचे व मुलीं वसतीगृहे बांधकाम करिता व महाविद्यालयाच्‍या सभागृहाचे अद्ययावत करण्‍याकरिता अतिरिक्‍त निधी देऊन दिनांक १४ ऑगस्‍ट रोजी माननीय मुख्‍यमंत्री व उपमुख्‍यमंत्री यांच्‍या हस्‍ते भुमिपुजन करण्‍याचे आश्‍वासन दिले.

कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, विद्यापीठांचे मुले व मुलीं अत्‍यंत गुणवंत असुन देश पातळीवर सांस्‍कृतिक क्षेत्रात सुवर्णपदक प्राप्‍त केले, ही अभिमानास्‍पद बाब आहे. विद्यार्थी व शेतकरी कल्‍याणाकरिता विद्यापीठ प्रयत्‍नशील आहे. विद्यापीठाने विविध पिकांचे उत्‍कृष्‍ट वाणांची निर्मिती केली असुन याचा लाभ शेतकरी बांधवा होत असल्‍याचे म्‍हणाले. प्रास्‍ताविकात डॉ धर्मराज गोखले यांनी कृषि महाविद्यालय व विद्यापीठाच्‍या शैक्षणिक कार्याबाबत माहिती दिली. कार्यक्रम यशस्‍वीतेकरिता प्राचार्य डॉ बाबासाहेब ठोंबरे यांच्‍या नेतृत्‍वाखाली महाविद्यालयाचे प्राध्‍यापक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.



















No comments:

Post a Comment