Friday, November 11, 2022

वनामकृवि विकसित तुरीचे वाण गोदावरी बहरली शेत शिवारात

 

पैठण तालुक्‍यातील मौजे थेरगाव येथील प्रगतशील शेतकरी कैलास निर्मळ हे गेल्या आठ दहा वर्षांपासून तूर पीक शेती करतात मागील आठ वर्षे त्यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या बदनापुर येथील कृषी संशोधन केंद्र निर्मित बिडीएन ७११ या वाणाची लागवड कोरडवाहू शेतीत करत होते. या खरिपात त्यांनी ६ एकर क्षेत्रावर ठिबकद्वारे याच केंद्राचा नवीन मर व वांझ रोग प्रतिबंधक आणि दाण्याचा रंग पांढरा १७० दिवसात तयार होणार बिडीएन ७११ पेक्षाही अधिक  उत्पादन देणारे वाण गोदावरी म्हणजे बिडीएन २०१३-४१ याची लागवड केली आहे. या भागात अतिवृष्टीमुळे खरीप पिकाचे नुकसान झाले, परंतु याही परिस्थितीत हा वान तग धरून राहिला आहे. या शेतकऱ्यांनी दोन ओळीतील अंतर १० फूट आणि दोन रोपांतील अंतर दीड फूट ठेवले आहे हे पीक सध्या फुलाने बहरले आहे. बिडीएन ७११ वाणाची फुले पिवळी तर गोदावरी या तूर वाणाची फुले पांढरी आहे. पैठण तालुका हा औरंगाबाद जिल्ह्यात तूर पीक आवडीने घेणारे शेतकऱ्यांचा तालुका आहे. मागील पाच वर्षांपासून विद्यापीठाच्या तूर वाणाची बियाणे शेतकरी बियाणे विक्री केंद्रातून घेऊन जात आहे, शिवाय शेतकऱ्यांना स्वतः च्या शेतातील बियाणे वापर करत लागवड करा असा संदेश देखील कृषी शास्रज्ञानी दिलेला आहे शिवाय आपआपल्या गावात इतर शेतकऱ्यांना ही बियाणे योग्य ती काळजी घेत देऊ शकतात असे ही सांगण्यात आलेले आहे त्यामुळे या तालुक्यात तूर पीक सध्या चांगलेच बहरले आहे.



सौजन्‍य : श्री रामेश्‍वर ठोंबरे, विभागीय कृषी विस्‍तार शिक्षण केंद्र, औरंगाबाद


Tuesday, November 8, 2022

मानवी समाजाच्‍या उन्‍नतीचा शेतकरी हाच केंद्रबिंदु ........... कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि

वनामकृविच्‍या वतीने संपुर्ण मराठवाडयातील ६० पेक्षा जास्‍त गावात राबविण्‍यात आला  ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ उपक्रम

उपक्रमांतर्गत  कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि मौजे मंगरूळ येथील शेतक-यांच्‍या प्रक्षेत्रावर भेट साधला संवाद

शेती विकास आणि शेतकरी कल्‍याण यात शासन, कृषि विभाग, कृषि विद्यापीठ आणि स्‍वत: शेतकरी हे महत्‍वाचे खांब असुन सर्वांनी एकत्रित कार्य केल्‍यास शेतकरी बांधवाची मोठी प्रगती शक्‍य आहे. करोना रोगाच्‍या काळात संपुर्ण जगात कृषि क्षेत्राची ताकद सर्वांनी अनुभवली असुन कृषिक्षेत्रानेच देशाची अर्थव्‍यवस्‍थेस व मानवी जीवनास तारले आहे. मानवी समाजाच्‍या उन्‍नतीचा शेतकरी हाच केंद्रबिंदु आहे, हे सिध्‍द होते, असे प्रतिपादन कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांनी केले.

महाराष्‍ट्र शासनाच्‍या सुचनेनुसार वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी च्या वतीने संपूर्ण मराठवाड्यात १ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर दरम्यान 'माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी' उपक्रम राबविण्यात येत असुन उपक्रमांतर्गत दिनांक ८ नोव्‍हेंबर रोजी एकाच दिवशी विद्यापीठ शास्‍त्रज्ञ संपुर्ण  मराठवाडयातील ६० पेक्षा जास्‍त गावात जाऊन शेतकरी बांधवाशी संवाद साधला. सदरिल उपक्रमांतर्गत विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि हे मानवत तालुक्‍यातील मौजे मंगरूळ येथे शेतक-यांच्‍या प्रक्षेत्रावर भेट देऊन संवाद साधला. कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक भारतीय किसान संघाचे सरसंघटनमंत्री मा श्री दादा लाड, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर, कुलसचिव डॉ धीरजकुमार कदम, प्रगतशील शेतकरी श्री अशोक दशमाने, श्री मधुकर जाधव, तालुका कृषि अधिकारी श्री प्रदिप कच्‍छवे, रेशीम शास्‍त्रज्ञ डॉ सी बी लटपटे, डॉ अनंत लाड, श्री गुलाब शिंदे, श्री रघुवीर नाईक आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मार्गदर्शनात कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि पुढे म्‍हणाले की, पिक उत्‍पादन वाढीत शुध्‍द बियाणे, दर्जेदार कृषि निविष्‍ठा सोबत सुधारित पिक व्‍यवस्‍थापन तंत्रज्ञानाची जोड आवश्‍यक आहे. अनेक शेतकरी स्‍वत: शेतीत नवनवीन प्रयोग करित आहेत. प्रयोगशील शेतकरी मा श्री दादा लाड यांनी विकसित केलेले कापुस लागवड तंत्रज्ञान अनेक शेतकरी स्‍वत: अवलंब करून या तंत्रज्ञानाची उपयुक्‍तता अधोरेखित केली आहे.  

मा श्री दादा लाड यांनी कापुस लागवड तंत्रज्ञानाबाबत माहिती देतांना म्‍हणाले की, कपासातील दोन झाडे आणि दोन ओळीतील आंतर कमी करून झाडांची संख्‍या योग्‍य राखणे आवश्‍यक आहे. झाडाच्या खालच्या गळफांद्या काढल्याने दाटी कमी होते. गळफांद्या काढल्यावर खोड शेंड्यापर्यंत जाड बनते. गळफांद्या काढल्याने बोंडाचा आकार मोठा होण्‍यास मदत होते. एकरी झाडांची संख्या वाढल्याने उत्पादनात वाढ होते असे ते म्‍हणाले.

डॉ देवराव देवसरकर यांनी आपल्‍या भाषणात विद्यापीठ विकसित विविध वाण आणि विद्यापीठ प्रकाशनाबाबत  माहिती दिली. कार्यक्रमाच्‍या प्रास्‍ताविकात श्री प्रदिप कच्‍छवे यांनी केले तर मुख्‍य अतिथीचा परिचय डॉ अनंत लाड यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन तालुका तंत्र सहाय्यक श्री योगेश पवार यांनी केले. यावेळी मान्‍यवरांनी प्रगतशील शेतकरी मधुकर जाधव आणि अशोक दशमाने यांच्‍या श्री दादा लाड कापुस तंत्रज्ञान प्रक्षेत्रास भेट दिली. प्रक्षेत्राच्‍या शिवार पर्यंत माननीय कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि आणि मा श्री दादा लाड यांनी बैलगाडीतुन प्रवास केला. या कार्यक्रमास परिसरातील ८६ गावातील शेतकरी उपस्थित होते.

 दिनांक ८ नोव्‍हेंबर रोजी राबविण्‍यात आलेल्‍या उपक्रमाकरिता विद्यापीठ शास्‍त्रज्ञांची २५ पथके तयार करण्‍यात आली होती, यात १२५ पेक्षा शास्‍त्रज्ञांचा समावेश होता. संपुर्ण दिवसात विद्यापीठ शास्‍त्रज्ञ शेतकरी बांधवाशी संवाद साधुन त्‍यांच्‍या कृषि विषयक समस्‍या जाणुन घेऊन शेतकरी बांधवाच्‍या शेतीस भेट देऊन विविध विषयांवर मार्गदर्शन करण्‍यात आले. सदर उपक्रमांची सुरूवात दिनांक १ सप्‍टेबर रोजी करण्‍यात आली असुन दिनांक १ सप्‍टेंबर रोजी संपूर्ण मराठवाड्यात ८० विद्यापीठ शास्‍त्रज्ञांचा समावेश असलेल्‍या २२ पथकांनी ६० गावांत तर दिनांक ३ ऑक्‍टोबर रोजी ११५ शास्‍त्रज्ञांचा समावेश असलेल्‍या २७ पथकांनी ६४ गावांत भेट देऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. शेतकरी बांधवांच्‍या शेती विषयी तांत्रिक समस्याचे समाधान करण्यात आले. सदरिल उपक्रम कृषि विभागाच्‍या सहकार्यांने राबविण्यात येत आहे.




मौजे कोळ पिंपरी व पांगरी (ता. धारूर, जि. बीड)

"माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी" उपक्रमांतर्गत कृषि महाविद्यालय अंबाजोगाई, विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्र आंबेजोगाई आणि कृषी विभाग ता. धारूर जि. बीड यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ८ नोंव्‍हेबर रोजी मौजे कोळ पिंपरी व पांगरी, ता. धारूर जि. बीड येथे भेट देऊन मौजे कोळ पिंपरी येथील शेतकरी श्री.विजयकुमार मुरलीधर खुळे, श्री.धनवीर चंद्रसेन तांबुरे तसेच मौजे पांगरी येथील श्री.अंकुश लक्ष्मणराव थोरात, दत्तात्रेय रामकृष्ण थोरात यांच्याशी शेतीतील विविध विषयावर चर्चा करून मार्गदर्शन करण्यात आले. सदरील शेतकरी मित्रांना सतत विद्यापीठातील शास्त्रज्ञ, विस्तार कृषि विद्यावेत्ता, कृषी विभागातील कृषी सहाय्यक, विविध विषयातील तज्ञ मंडळींच्या यांच्या संपर्कात राहून शेती विषयक ज्ञान संपादन करीत असतात. सदरील दोन्ही गावे ही कृषी विभागाच्या पोकरा या योजनेअंतर्गत येत असल्याने संबंधित शेतकऱ्यांनी पोकरा योजनेतून तुषार सिंचन तसेच यांत्रिकीकरण याचा लाभ घेतला आहे. शेतीतील विविध अडचणी विषयी बोलताना त्यांनी प्रामुख्याने विद्युत पुरवठा नियमित नसणे तसेच रानडुकरांचा व हरणांचा मोठा उपद्रव होणे या गोष्टीकडे लक्ष वेधले. यावेळी सहयोगी अधिष्‍ठाता डॉ.एस.डी. बंटेवाड, डॉ. व्ही. पी. सूर्यवंशी, विस्तार कृषी विद्यावेत्ता, विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्र आंबेजोगाई, श्री प्रा. सी. बी. अडसूळ, कीटक शास्त्रज्ञ, कृषी महाविद्यालय आंबेजोगाई तसेच श्री. शरद शिंगारे, तालुका कृषी अधिकारी धारूर जिल्हा बीड हे उपस्थित होते.

Monday, November 7, 2022

माननीय फलोत्पादन मंत्री यांची माननीय कुलगुरू यांनी घेतली भेट

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा.डॉ इन्‍द्र मणि यांची फलोत्पादन मंत्री माननीय नामदार श्री संदिपान भुमरे, आमदार मा श्री हरिभाऊ नाना बागडे व जिल्हाधिकारी मा श्री असतीन कुमारपांडे यांची दिनांक ७ नोव्‍हेंबर रोजी भेट घेतली. माननीय कुलगुरू यांनी विद्यापीठातील सद्यस्थिती व पुढील संशोधनाविषयी माननीय मंत्री महोदयांना अवगत केले. फळ संशोधन केंद्र तसेच औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील इतर संशोधन केंद्र कृषी महाविद्यालय यांनी केलेले संशोधनाबाबत सखोल चर्चा करण्यात आली. फळ संशोधन केंद्र येथील आंब्याचे व चिंचेच्या विविध वाणा व त्याची वैशिष्ट्य याबाबत माहिती केंद्राचे प्रमुख डॉ. एम बी पाटील यांनी दिली तर मोसंबी पिकातील विविध समस्या व त्यावरील उपाय यावर बदनापूर मोसंबी संशोधन केंद्राचे श्री संजय पाटील सोयगावकर यांनी माहिती सादर केली. बदनापूर येथील कृषी संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ डी के पाटील यांनी तुर मूग व हरभरा या पिकांविषयी संशोधित केलेले विविध वाणाबाबत माहिती सादर केली तुरी चे वाण बीडीएन-७११ हे शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय झाले असून भारतात जवळ जवळ ५० टक्के क्षेत्र हे या वाणाखाली आहे. डॉ सूर्यकांत पवार यांनी बाजरा संशोधन केंद्र विषयी झालेले प्रगती या वेळेला सादर केली. सदरील बैठकीस अशी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राकेश अहिरे, कृषी विद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण जाधव व इतर शास्त्रज्ञ यावेळी उपस्थित होते.

Saturday, November 5, 2022

आंतर महाविद्यालयीन बुध्दिबळ स्‍पर्धा संपन्‍न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत आंतर महाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धा पा‍थ्री येथील डॉ. गंगाधरराव पाथरीकर कृषी महाविद्यालयात पार पडल्या. उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष मित्र साधना शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री. द्वारकाभाऊ पाथ्रीकर हे होते तर प्रमुख पाहुणे म्‍हणुन विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. एस. एस मोरे हे उपस्थित होते. व्यासपीठावर मित्र साधना शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष श्री राजेंद्रभाऊ पाथ्रीकर, प्राचार्य डॉ. एस. आर नागरगोजे आदींची प्रमुख उपस्थिती होती. मान्‍यवरांच्‍या हस्ते दीपप्रज्वलन व कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

स्पर्धेत शासकीय व अशासकीय अश्या एकुण १४ महाविद्यालयांनी सहभाग नोंदवला होता. त्यातून सर्वोत्तम कामगिरी, प्रथम पारितोषिक एम. जी. एम जैवतंत्रज्ञान महाविद्यालय औरंगाबाद तर द्वितीय पारितोषिक कृषी महाविद्यालय बदनापुर यांनी मिळवले. विजयी संघांना पारितोषिक व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ. व्ही. पी वावधने यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका नरोटे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. वासनिक यांनी केले. पंच समितीत डॉ. राऊत, डॉ. पाटील, डॉ. दडके, डॉ. झाटे, श्री पंडित, श्री राठोड, डॉ वासनिक, वाहेकर समावेश होता. कार्यक्रमास प्राध्यापक व विद्यार्थी मोठया संख्‍येने उपस्थित होते.