अधिक नफ्यासाठी विक्री व्यवस्थापनाची कला शेतकऱ्यांनी आत्मसात करावी... माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि
भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या नागपूर येथील केंद्रीय कापूस
संशोधन संस्था आणि खरपुडी (जालना) येथील कृषि विज्ञान केंद्र-१ यांच्या संयुक्त
विद्यमाने विशेष कापूस प्रकल्पांतर्गत दिनांक ७ फेब्रुवारी रोजी कापूस पिकाच्या उत्पादनवाढीसाठी शेतकरी मेळाव्याचे
आयोजन मौजे सावरगाव (हडप),
जालना येथे करण्यात आले. या मेळाव्याचे उद्घाटन वसंतराव नाईक
मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या हस्ते
संपन्न झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठवाडा शेती सहाय्य मंडळाचे सचिव,
कृषि रत्न माननीय श्री विजय अण्णा बोराडे उपस्थित होते. यावेळी विस्तार
शिक्षण संचालक डॉ. गिरधारी वाघमारे, केंद्रीय कापूस संशोधन
संस्थेचे संचालक डॉ. वाय. जी. प्रसाद, केंद्रीय कापूस संशोधन
संस्थेचे संशोधन समिती सदस्य व सल्लागार श्री दादा लाड, कृषि
उपसंचालक श्री कायंदे, विशेष कापूस प्रकल्पाचे नोडल अधिकारी
डॉ. अर्जुन तायडे, शास्त्रज्ञ डॉ. सुनील महाजन, कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. एस. व्ही. सोनुने आदींची प्रमुख उपस्थिती
होती.
याप्रसंगी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी
उद्घाटनपर भाषण करताना शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराचे महत्त्व सांगितले. ते
म्हणाले,
"उत्कृष्ट शेतीमधूनच भविष्यातील विकसित भारताचे स्वप्न पूर्ण
होईल. शेतकऱ्यांसाठी कार्य करण्याची ईश्वरीय शक्ती आपल्याला मिळालेली आहे.
विद्यापीठ ‘शेतकरी देवो भव:’ या भावनेतून कार्य करत आहे." त्यांनी पुढे
सांगितले की, शेतीमध्ये उत्पादकतेपेक्षा आर्थिक नफा किती
झाला याकडे लक्ष द्यावे लागेल. तसेच, अधिक नफा मिळवण्यासाठी
विक्री व्यवस्थापनाची कला शेतकऱ्यांनी आत्मसात करावी. महाराष्ट्रातील कृषि
विकासासाठी दूरदर्शी धोरणे आवश्यक असून, कै. वसंतरावजी नाईक
यांनी हवामान विभागानुसार चार कृषि विद्यापीठांची स्थापना करून शेती क्षेत्राला
मोठी चालना दिली. त्यामुळे कृषि शिक्षण आणि मनुष्यबळाचा विकास घडून आला. कृषि
शिक्षण क्षेत्राला उद्योगांशी जोडण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी प्रतिपादन
केले.
या मेळाव्यात विविध मान्यवरांनी मार्गदर्शन केले. हा शेतकरी मेळावा अत्यंत यशस्वी झाला असून, शेतकऱ्यांनी या माध्यमातून कापूस शेतीबाबत महत्त्वाची माहिती आणि आधुनिक तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन मिळवले.
No comments:
Post a Comment