Thursday, December 28, 2023

कृषी विज्ञान केंद्राचे तंत्रज्ञान शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांच्या शेतावर राबवावे.......डॉ. इन्द्र मणी



वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत असलेल्या कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञांनी विद्यापीठाचे व कृषीचे इतर प्रगतंत्रज्ञानाची प्रात्यक्षिक धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतावर प्रभावीपणे राबवून शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास साधावा असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठा कृषी विद्यापीठ, परभणीचे कुलगुरू डॉ. इन्द्र मणी यांनी कृषी विज्ञान केंद्र तुळजापूर येथे केले. कृषी विज्ञान केंद्र तुळजापूरच्या सोळाव्या वैज्ञानिक सल्लागार समितीच्या बैठकीत आयोजित प्रक्षेत्र फेरी दरम्यान ते बोलत होते. या समयी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, विद्यापीठ अभियंता श्री दीपक काशाळकर कृषी विज्ञान केंद्राच्या कार्यक्रम समन्वयक श्रीमती वर्षा मारवाळीकर व इतर शास्त्रज्ञ उपस्थित होते
 कुलगुरू डॉ. इन्द्र मणी पुढे म्हणाले की कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावरील मच्छी पालन, अंडी उबवणूक, कुकूटपालन शेळीपालन एकक या प्रात्यक्षिकांमधून येथे भेट देणारे शेतकरी पशुपालक बोध तर घेतीलच परंतु कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञांनी हे प्रयोग प्रात्यक्षिक जशास तसे शेतकऱ्यांच्या शेतावर राबवून शेतकऱ्यांचा पशुपालकांचा विश्वास तर द्विगुणित करावाच त्यासोबत त्यांचे उत्पन्न वाढल्यामुळे परिसरातील इतर शेतकरी यशस्वी शेतकऱ्यांचे अनुकरण करतील आणि अशा प्रकारे शेतीतील प्रगती साधता येईल. तसेच कृषी विज्ञान केंद्र तुळजापूर हे तीर्थक्षेत्र श्री तुळजाभवानी शहरालगत असल्यामुळे याला एक वेगळे महत्त्व असून विद्यापीठ या कृषि विज्ञान केंद्राच्या विकासाकरिता सर्वतोपरी प्रयत्नशील असून येत्या दोन वर्षाच्या काळात या परिसराचा चेहरा मोहरा आपण बदलून दाखवू असे ते म्हणाले.
 दरम्यान पहिल्या सत्रात पार पडलेल्या वैज्ञानिक सल्लागार समितीचा समारोप करताना डॉ. इन्द्र मणी म्हणाले की धाराशिव जिल्ह्यातील सर्व सहयोगी विभागांनी, कृषी विज्ञान केंद्राची कार्यक्षमता वाढविण्याकरिता सूचना कराव्यात जेणेकरून त्या सूचनांमुळे शेतकऱ्यांचे जीवनमान वाढवून त्यांच्या उत्पादनात देखील दुपटीने वाढ करता येणे शक्य होईल अशा सर्व सूचनांचे आम्ही स्वागत करून त्यांची ताबडतोब अंमलबजावणी करण्याची त्यांनी ग्वाही दिली. वैज्ञानिक सल्लागार समितीच्या बैठकीच्या प्रारंभी कार्यक्रम समन्वयक प्रा. वर्षा मरवाळीकर यांनी प्रास्ताविक तसेच इतर सर्व शास्त्रज्ञांनी विविध विभागांचे सादरीकरण केले. सदरील बैठकीस वनामकृवि, परभणी चे विस्तार शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, धाराशिवचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री रवींद्र माने पशुसंवर्धन विभागाचे जिल्हा उपायुक्त डॉ हुलसुरे जिल्हा पशु सवर्धन अधिकारी डॉ पुजारी व इतर सहयोग विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
 सरते शेवटी कृषी विज्ञान केंद्राच्या अतिशय जिव्हाळ्याची असणारी संरक्षक भिंतीचे भूमिपूजन सौ व श्री डॉ. इन्द्र मणी यांच्या शुभहस्ते पार पडले. यावेळी विद्यापीठ अभियंता श्री दीपक काशाळकर, विभागाचे श्री दयानंद टेकाळे श्री ढगे, गुत्तेदार श्री बालाजी जाधव, कृषी संशोधन केंद्राचे श्री लतीफ चौधरी तसेच कृषी विज्ञान केंद्राचे सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
 या सर्व कार्यक्रमांचे सूत्रसंचालन डॉ विजयकुमार जाधव, आभार प्रदर्शन डॉ भगवान आरबाड यांनी तर यशस्वीतेसाठी डॉ. भैयासाहेब गायकवाड, डॉ दर्शना भुजबळ, श्रीमती अपेक्षा कसबे, डॉ नकुल हारवाडीकर, श्री बालाजी कुंभार, श्री जगदेव हिवराळे, शिवराज रुपनर, बालाजी कदम, मोरेश्वर राठोड, शत्रुघ्न रनेर आदींनी प्रयत्न केले.

No comments:

Post a Comment