Thursday, December 14, 2023

वनामकृवि आयोजित बाराव्‍या राष्ट्रीय बियाणे परिषदेचा समारोप

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी, भारतीय बीज तंत्रज्ञान संस्था, नवी दिल्ली, आणि राष्ट्रीय बियाणे संशोधन व प्रशिक्षण केंद्र, वाराणसी यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच भारत सरकारच्‍या कृषि व शेतकरी कल्याण विभाग, कृषि मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या सहकार्याने १२ व्या राष्ट्रीय बियाणे परिषदेचे आयोजन दिनांक ११ ते १३ डिसेंबर दरम्यान छत्रपती संभाजीनगर येथे करण्यात आले होते. सदर परिषदेच्‍या समारोप दिनांक १३ डिसेंबर रोजी झाला. कार्यक्रमा प्रमुख पाहुणे भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे माजी महासंचालक  पद्ममभूषण मा डॉ आर एस परोडा होते तर अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि हे होते. व्‍यासपीठावर आयएसएसटीचे अध्‍यक्ष डॉ डि एस गुप्‍ता, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, आयोजन सचिव डॉ के एस बेग, आयएआरआय विभाग प्रमुख डॉ शिव के यादव आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मार्गदर्शनात मा डॉ आर एस परोडा म्‍हणाले की, देशातील हवामान हे विविध पिकांच्‍या बीजोत्‍पादनास अनूकुल असुन बियाणे निर्याीतीस भारतास मोठा वाव आहे. देशांतर्गत बियाणाची गरज भागवून आपण अगदी नगण्य अशी बियाणे निर्यात करतो आहोत; दर्जेदार बियाणे निर्मिती करणे हे पहिले धेय्य असेल पाहिजे. बियाणे कायद्यात सुधारणा करण्याची गरज आहे. बियाणे उत्पादन वाढीसाठी पोषक वातावरण असल्याने निर्यातीचीही संधी आहे. बियाण्यांच्या एकुणच विकास आणि विस्तारात शेतकरी प्रथम कसा घेता येईल, यासह आपल्या भविष्यातील अपेक्षा व भुमिका लक्षात घेऊन बियाण्यासाठी रोडमॅप तयार करावा लागेल. शेतकरी वाण सुरक्षा तसेच त्या संदर्भातील नोटिफिकेशनची पध्दती सुलभ करण्याची गरज आहे. बियाणे उद्योग विस्तारासाठी सर्वांनी एकसंघ होऊन काम करावे लागेल. युवकांचा बियाणे उद्योग विस्तारात कसा उपयोग होतो किंवा त्याला कसे प्रोत्साहित करता येईल हे पाहावे लागेल. बियाण्याविषयी समाजाची जागरुकता वाढवावी लागेल. त्यासाठी जाणीवपुर्वक प्रयत्न करावे लागतील. बियाणे बदलातील विशेष करुन संकरीत वाणाची बियाणे बदलातील प्रमाण अत्यंत कमी असल्याचे डॉ. पराडा म्हणाले.

अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ इन्‍द्र मणि म्हणाले की, कृषि क्षेत्राचा विकास करण्यासाठी चार गोष्टीची आवश्यकता लागते यात कृषि शास्त्रज्ञ, कृषि उद्योजक,  शेतकरी आणि सरकार या चार क्षेत्रातील लोकांनी एकत्र आले पाहिजे. डॉ. यादव यांनी तांत्रिक क्षेत्रातील महत्वाच्या मुदयाचा उभा करुन सुचविलेल्या शिफारसीची माहिती दिली. प्रास्‍ताविक डॉ दत्तप्रसाद वासकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ डी जी मोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ के एस बेग यांनी केले.  

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे (वनामकृवि) कुलगुरु मा डॉ. इन्‍द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली या परिषदेची बदलत्या हवामान स्थितीत नवसंशोधन व दर्जेदार बियाणे उपलब्धतेसाठी निर्माण झालेली आव्हाने ही संकल्पना होती.परिषदेत उत्तम सादरीकरण करणा­यांना तसेच पोस्टर स्पर्धकांना या वेळी गौरविण्यात आले. परिषदेच्या आयोजनासाठी निमंत्रक ‘वनामकृवि’ चे संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर, आयोजन सचिव कापुस विशेषज्ञ डॉ. के. एस. बेग यांच्या मार्गदर्शनाखाली विविध समित्यांचे अध्यक्ष, सदस्यांनी या परिषदेसाठी परिश्रम घेतले. तीन दिवसीय सदर परिषदेस देशाचे व राज्याचे कृषि शास्त्रज्ञ, बियाणे उद्योजक, प्रगतशील शेतकरी, शेतकरी उत्‍पादक कंपन्‍याचे प्रतिनिधी, संशोधक विद्यार्थी आदींनी सहभाग नोदंविला होता. परिषदेमध्ये एकूण सहा तांत्रिक सत्रांमध्ये व तीन समूह चर्चा सत्रांमध्ये बियाणे विषयक विविध विषयांवर संशोधन व तंत्रज्ञाना संबंधी शास्त्रज्ञांचे सादरीकरण व चर्चा झाली.


No comments:

Post a Comment