Thursday, May 28, 2026

मौजे आडगाव येथे एल-निनोच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी विशेष मार्गदर्शन बैठक संपन्न

 

यावर्षीच्या खरीप हंगामात एल-निनो चा प्रभाव राहण्याची शक्यता लक्षात घेऊन शेती क्षेत्रात योग्य नियोजन कसे करावे तसेच हवामानानुरूप तंत्रज्ञानाचा अवलंब करून संभाव्य संकटांना कसे सामोरे जावे, याबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ अंतर्गत अखिल भारतीय समन्वयित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्पाद्वारे राबविण्यात येत असलेल्या एकात्मिक शेती पद्धती प्रकल्पांतर्गत मौजे आडगाव, ता. पालम येथे विशेष मार्गदर्शन बैठकीचे दिनांक २८ मे २०२६ रोजी आयोजन करण्यात आले होते.

या बैठकीचे आयोजन विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि आणि संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या बैठकीस परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. गणेश गायकवाड यांनी उपस्थित शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.

यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, एल-निनोमुळे पावसाचे प्रमाण कमी होणे, पावसाचे अनियमित वितरण होणे तसेच दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी आगाऊ नियोजन करून हवामान बदलाशी सुसंगत शेती तंत्रज्ञानाचा अवलंब करणे आवश्यक आहे.

पीक व्यवस्थापनाविषयी माहिती देताना त्यांनी कमी पाण्यावर तग धरणाऱ्या पिकांची निवड करणे, वेळेवर पेरणी करणे तसेच जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी योग्य मशागत पद्धतींचा वापर करणे आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच खत व्यवस्थापन करताना जमिनीच्या परीक्षणानुसार संतुलित खतांचा वापर करावा, सेंद्रिय खतांचा वापर वाढवावा आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचा योग्य प्रमाणात वापर करावा, असेही त्यांनी नमूद केले.

अंतरपीक पद्धतीचा अवलंब केल्यास उत्पादनातील जोखीम कमी होऊन शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळू शकते, असे त्यांनी सांगितले. यासोबतच रुंद वरंबा-सरी पद्धतीचा अवलंब केल्यास पावसाचे पाणी जमिनीत अधिक प्रमाणात मुरते, ओलावा टिकून राहतो आणि पिकांची वाढ चांगली होते, अशी माहिती त्यांनी दिली.

बैठकीदरम्यान शेतकऱ्यांनी विविध प्रश्न उपस्थित करून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शाश्वत शेती, जलसंधारण, पीक नियोजन आणि दुष्काळ व्यवस्थापन या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रकल्पाचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. आनंद गोरे, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. गणेश गायकवाड तसेच श्री. सुरेश खटिंग यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त करून आयोजकांचे कौतुक केले.

या कार्यक्रमास गावातील शेतकरी, ग्रामस्थ तसेच कृषी क्षेत्राशी संबंधित मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.





No comments:

Post a Comment