मागील आठवड्यात सतत पाऊस झाल्याने बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टी सुद्धा झालेली आहे. त्यामुळे खरीपातील सोयाबीन, कापूस, तूर व हळद यावर पिकांवर विपरीत परिणाम होताना दिसून येत आहे. अशा परीस्थितीत शेतामध्ये पाणी साचून राहत असल्यामुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ताबडतोब या पिकांमधील अतिरिक्त पाण्याचा निचरा करणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच पुढील प्रमाणे नमुद केलेल्या उपाय योजना करून सोयाबीन पिकामधील अतिवृष्टी नंतर पीक व्यवस्थापनाचे तंत्रज्ञान शेतकरी बंधुंनी अवलंबावे, असा सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्रातील शास्त्रज्ञ डॉ.जी.डी.गडदे, डॉ.डी.डी.पटाईत आणि श्री.एम.बी.मांडगे यांनी दिला आहे.
सोयाबीन :
1. सोयाबीन पिकात सततच्या पावसामुळे तसेच ढगाळ वातावरणामुळे आणि जमीनीत पाणी साचल्यामुळे पिकांना मुळाद्वारे अन्नद्रव्य घेण्याची क्रिया मंदावली आहे. अशा परिस्थितीमध्ये सर्व प्रथम शेतामधून अतिरिक्त पाण्याचा निचरा लवकरात लवकर करावा.
2. या वातावरणामध्ये शंखी गोगलगायीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. गोगलगायीच्या नियंत्रणाकरीता दाणेदार मेटाल्डीहाईड हे गोगलगायनाशक 2 किलो प्रति एकर याप्रमाणे शेतामध्ये, बांधाच्या कडेला आणि बांधावर सायंकाळच्या वेळी पसरवून द्यावे.
3. सध्या सर्वत्र सोयाबीन फुले तसेच काही ठिकाणी शेंगा लागण्याच्या अवस्थेत आहे. सोयाबीनवर मोठ्या प्रमाणात पाने खाणाऱ्या, शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांचा तसेच खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी लवकरात लवकर खालीलपैकी एका कीटकनाशकाची फवारणी करावी.
क्लोरॅट्रानिलीप्रोल 18.5% - 60 मिली (3 मिली प्रति 10 लिटर पाणी) प्रती एकर
किंवा
इंडाक्झाकार्ब 15.8%
- 140 मिली (7 मिली प्रति 10 लिटर पाणी) प्रती एकर
किंवा
असिटामाप्रीड 25%+
बाईफैंन्थ्रीन 25% -100 ग्रॅम (5 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी) प्रति एकर
किंवा
क्लोरॅट्रानिलीप्रोल
9.3% + लॅम्बडा सायहॅलोथ्रिन 4.60% - 80 मिली (4 मिली प्रति 10 लिटर
पाणी) प्रती एकर
किंवा
आयसोसाक्लोसिरम 9.2%
- 240 मिली (12 मिली प्रति 10 लिटर पाणी) प्रती एकर
तसेच येणाऱ्या काळात शेंगा करपा, रायझोक्टोनिया एरियल ब्लाईट, चारकोल रॉट आणि इतर बुरशीजन्य रोगांचा ही प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्याकरिता पावसाचा अंदाज घेऊन टेब्युकोनॅझोल 10%+ सल्फर 65% (पूर्वमिश्रित बुरशीनाशक) - 500 ग्रॅम प्रति एकर (25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात) किंवा टेब्युकोनॅझोल 25.9% -250 मिली ( 12.5 मिली प्रति 10 लिटर पाण्यात) किंवा पायरोक्लोस्ट्रोबीन 20% - 150 ते 200 ग्रॅम ( 7.5 ते 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात ) किंवा पायरोक्लोस्ट्रोबीन 13.3%+ इपिक्साकोनाझोल 5% (पूर्वमिश्रित बुरशीनाशक) -300 मिली ( 15 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात ) प्रति एकर फवारावे.
तसेच अशा ठिकाणी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ निर्मीत बायोमिक्स किंवा ट्रायकोडर्मा या जैविक बुरशी युक्त औषधाची 4 किलो प्रति एकर याप्रमाणे आळवणी करावी.
पिकांमध्ये
फवारणी करताना घ्यावयाची विशेष काळजी: कुठलीही फवारणी करताना पावसाचा
अंदाज घेऊनच फवारणी करावी. वरील कीटकनाशका सोबत कुठल्याही प्रकारचे इतर कीटकनाशके, बुरशीनाशके, विद्राव्य खते,सूक्ष्म
मूलद्रव्ये अथवा रसायने मिसळू नये. लागोपाठ एकच एक कीटकनाशक फवारू नये. फवारणी
करिता दुषित पाणी न वापरता स्वच्छ पाणी वापरावे आणि पाण्याचे प्रमाण शिफारसितच
वापरावे, कमी पाणी वापरल्यास फवारणीचे अपेक्षित परिणाम दिसून
येत नाही. किडनाशके फवारणी करताना योग्य ती संरक्षक विषयी काळजी घ्यावी
अधिक माहितीसाठी संपर्क करा : कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी
दुरध्वनी क्रमांक 02452-22900, व्हाटस्अप हेल्पलाईन- 8329432097
संदर्भ : वनामकृवि
संदेश क्रमांक- 04/2025( 21 ऑगस्ट 2025)