Tuesday, April 29, 2025

एडीएम शाश्वत शेती उपक्रम अंतर्गत प्रशिक्षणार्थीना प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

 कृषी तंत्रज्ञान व संवाद कौशल्याचा संगमातून येणाऱ्या खरीपात दिसेल सोयाबीनच्या उत्पादनात क्रांती - डॉ.बाबासाहेब ठोंबरे

कृषि महाविद्यालय लातूर, मांजरा कृषि विज्ञान केंद्र, लातूर आणि एडीएम यांच्या वतीने  कृषि विस्तार प्रशिक्षकांसाठी मांजरा कृषि विज्ञान केंद्र, लातूर येथे दिनांक २५ एप्रिल ते २७ एप्रिल २०२५ दरम्यान तीन दिवसीय निवासी प्रशिक्षण कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

या प्रशिक्षण कार्यक्रमाचा उद्देश कृषी तंत्रज्ञान, एकात्मिक पीक व्यवस्थापन, आणि शाश्वत शेतीच्या तत्त्वज्ञानासंबंधी प्रशिक्षकांना अद्ययावत ज्ञान प्रदान करणे हा होता. खरीप हंगामच्या पूर्व तयारीच्या दृष्ठीने या प्रशिक्षण कार्यक्रमाचे अनन्य साधारण महत्व असून १ मे पासून पेरणी पूर्व कार्यशाळांचे आयोजन सुरू करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ.बाबासाहेब ठोंबरे (अधिष्ठाता, कृषी महाविद्यालय, लातूर) यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.सचिन डिग्रसे, प्रमुख शास्त्रज्ञ, मांजरा कृषी विज्ञान केंद्र, लातूर हे होते. प्रमुख अतिथी म्हणून एडीएमचे वाणिज्य विभाग प्रमुख एम.बी.गाजरे व व्यवस्थापक अमोल धवन उपस्थित होते. उद्घाटन समारंभात मान्यवरांनी प्रशिक्षण कार्यक्रमाच्या महत्त्वावर आणि शेतकऱ्यांसाठी त्याचे दूरगामी परिणाम यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमात कृषी क्षेत्रातील विविध तज्ज्ञांनी विविध महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन केले. पीक उत्पादन वाढीसाठी पिकाच्या प्रत्येक अवस्थेत जिवाणूंचे कार्य अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगून शेतकऱ्यांनी जिवाणू संवर्धके व बायोमिक्सचा वापर करावा असे डॉ.कल्याण आपेट म्हणाले. तर संतुलित पीक पोषणासाठी जमीन हा सर्वात महत्त्वाचा मोठा घटक आहे. 'जमीन चांगली तर आपले आरोग्य चांगले' यासाठी शेतकऱ्यांनी जमिनीच्या शाश्वत सुपीकते कडे लक्ष द्यावे असे आवाहन डॉ.हरिहर कौसडीकर यांनी केले. आणि एकात्मिक पीक संरक्षणाचे महत्त्व सांगून निविष्ठा खरेदी करताना शेतकऱ्यांनी लेबल क्लेम वाचूनच खरेदी करावेत व त्याची पावती घ्यावी असे विचार डॉ.विजय भामरे यांनी व्यक्त केले. अधिक उत्पादनक्षम वाण, तण व्यवस्थापन, बी.बी.एफ पद्धतीने पेरणी, अन्नद्रव्य व्यवस्थापन व आपल्याकडील उपलब्ध पाणी व्यवस्थापन   याची एकत्रित सांगड घालणे गरजेचे आहे असे मत डॉ.वसंत सूर्यवंशी यांनी व्यक्त केले. शेतातील कामे अधिक जलद, सोपी, वेळेवर व परिणामकारक होण्यासाठी कृषी यांत्रिकीकरणाची आवश्यकता आहे असे डॉ.सचिन शिंदे यांनी सांगितले. डॉ.संजय राठोड, प्रा.संदीप देशमुख आणि प्रा.प्रवीण मताई यांच्याकडून बीजोत्पादन तंत्रज्ञान, एकात्मिक किड आणि रोग व्यवस्थापन, एकात्मिक पीक व्यवस्थापन, शाश्वत शेती तंत्रज्ञान, जलसंधारण उपाय आणि कृषी तंत्रज्ञानातील नव्या शोध यावर सखोल माहिती प्रदान केली. प्रशिक्षण कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश कृषी विस्तारकांना आद्ययावत शेती पद्धती, संवाद कौशल्य आणि शेतीतील तंत्रज्ञानाचा योग्य वापर शिकविणे हा होता. यावेळी कार्यशाळा, गट चर्चा आणि प्रात्यक्षिके यासारख्या विविध शैक्षणिक पद्धतींचा वापर करून, प्रशिक्षकांना त्यांचे कौशल्य अधिक प्रभावीपणे वापरण्याची प्रेरणा देण्यात आली. कार्यक्रमाने प्रशिक्षकांना त्या ज्ञानाचा वापर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सक्षम केल्याचे डॉ.सचिन डिग्रसे यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या समारोपात डॉ.बाबासाहेब ठोंबरे यांनी शेतीतील तंत्रज्ञानाच्या वापराबाबत विचार मांडले आणि शेतकऱ्यांसाठी ते कसे फायदेशीर ठरू शकते यावर प्रकाश टाकला. त्यांनी प्रशिक्षकांना शेतीच्या नव्या तंत्रज्ञानाचे महत्त्व सांगितले आणि त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविण्याची आवश्यकता व्यक्त केली. या कार्यक्रमामुळे कृषी विस्तारकांना शाश्वत शेती आणि पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाबद्दलचे अद्ययावत ज्ञान मिळाले. याचा प्रभाव लवकरच शेतकऱ्यांच्या उत्पादन क्षमता व पर्यावरणीयदृष्ट्या जबाबदार पद्धतींमध्ये दिसून येईल. सेवानिवृत्त सहायक वनसंरक्षक शिवाजी गिरी समारोप कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. या तीन दिवसीय कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी एडीएमच्या वतीने प्रा.आश्रुबा जाधव, सेवानिवृत्त वरिष्ठ संशोधक सहाय्यक यांनी नियोजन केले तर बिभीषण शिंगारे, दयानंद माने यांनी परिश्रम घेतले.