Wednesday, February 28, 2024

Sunday, February 18, 2024

वनामकृवित पश्चिम विभागीय कृषि मेळावा आणि कृषी प्रदर्शनीचे भव्‍य आयोजन

देशातील महाराष्‍ट्रासह सहा राज्‍यातील शेतकरी बांधव आणि कृषि तज्ञांचा सहभाग

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि परभणी आत्‍मा, कृषि विभाग (महाराष्‍ट्र शासन) यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने कृ‍षी तथा शेतकरी कल्‍याण मंत्रालय (भारत सरकार), नवी दिल्‍ली पुरस्‍कृत पश्चिम विभागीय कृषि मेळावा आणि कृषि प्रदर्शनीचे भव्‍य आयोजन दिनांक २१, २२, आणि २३ फेब्रुवारी, २०२४ रोजी विद्यापीठाच्‍या क्रीडा संकुल प्रागंणात करण्‍यात आले आहे. मेळाव्‍याचा उदघाटन सोहळा दिनांक २१ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी १०.३० वाजता आयोजित करण्‍यात आला असुन उदघाटन माननीय कृषि मंत्री मा ना श्री धनंजय मुंडे यांच्‍या व्दारे होणार आहे. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि हे राहणार असुन विशेष अतिथी म्‍हणुन राज्‍य कृषी मुल्‍य आयोगाचे अध्‍यक्ष मा श्री पाशा पटेल, भारतीय कृषि संशोधन संस्‍थेचे संचालक तथा कुलगुरू मा डॉ ए के सिंग, राष्‍ट्रीय कामधेनु आयोागाचे अध्‍यक्ष डॉ वल्‍लभभाई कथारिया, सदस्‍य श्री सुनिल मानसिंगका, भारतीय किसान संघाचे राष्ट्रीय संघटन मंत्री श्री दिनेश कुलकर्णी, प्रसिध्‍द सिने अभिनेता श्री उपेंद्र लिमये, नियोजन आयोगाचे माजी सदस्‍य डॉ व्‍ही व्‍ही सदामते आदीसह विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सन्‍माननीय सदस्‍य, मराठवाडा विभागातील संसद सदस्‍य, विधानसभा, विधान परिषद सदस्‍य, देशाच्‍या व राज्‍याच्‍या कृषि मंत्रालयातील वरिष्‍ठ अधिकारी, विविध कृषि विद्यापीठाचे कुलगुरू, भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे संचालक उ‍पस्थित राहणार आहे. समारोपीय कार्यक्रम माननीय कृषि मंत्री मा ना श्री धनंजय मुंडे आणि पुणे येथील कृषी परिषदेचे उपाध्‍यक्ष मा ना श्री प्रकाशजी आबीटकर उपस्थित पाडणार आहे.

कृषि मेळाव्‍यात पश्चिम भारतातील महाराष्‍ट्र, गुजरात, राजस्‍थान, मध्‍य प्रदेश, छत्‍तीसगड, गोवा या राज्‍यासह दीव-दमन आणि दादर नगर हवेली येथील शेतकरी बांधव, कृषी तज्ञ, कृषि संशोधक, धोरणकर्ते, कृषि कंपन्‍या, कृषि अधिकारी, कृषि विस्‍तारक, आणि कृषि उद्योजक हजारोच्‍या संख्‍येने सहभागी होणार आहेत. मेळाव्‍याचा मुख्‍य विषय ‘हवामान-अनुकूल शाश्वत शेतीद्वारे शेतक-यांची समृद्धी’ आहे. यात चर्चासत्रे, शास्‍त्रज्ञ-शेतकरी संवाद आदींव्‍दारे विविध विषयावर तज्ञ मं‍डळी मार्गदर्शन करणार आहेत. सदर शेतकरी मेळावा आणि  कृषि प्रदर्शनीच्‍या माध्‍यमातुन राष्‍ट्रीय-आंतरराष्‍ट्रीय पातळीवरील नाविण्‍यपूर्ण कृषि तंत्रज्ञान, कृषि संशोधन पाहण्‍याची सुवर्ण संधी शेतकरी बांधवांना उपलब्‍ध होणार आहे. भव्‍य कृषि प्रदर्शनीत अद्ययावत कृषि तंत्रज्ञानावर आधारित विविध सार्वजनिक संस्‍था, खासगी कंपन्‍या, अशासकीय संस्‍था, शेतकरी उत्‍पादक कंपन्‍या आणि बचत गट यांच्‍या ३०० पेक्षा जास्‍त दालनांचा समावेश राहणार आहे. यात विषशेत: दर्जेदार बी-बियाणे, रोपे, खत, किटकनाशके, कृषि औजारे, कृषी निविष्ठा, डिजिटल तंत्रज्ञान, ड्रोन तंत्रज्ञान, आधुनिक सिंचन पध्‍दती, पशुधन इत्‍यादी दालनांचा समावेश राहील. यावेळी जिल्‍हा ग्रामीण विकास यंत्रणा वतीने बचत गटांच्‍या दालनांचा समावेश असलेल्‍या खाद्य महोत्‍सवाचेही आयोजन करण्‍यात आले आहे.

सर्व कृषि बांधव, कृषि उद्योजक, कृषि अधिकारी आणि कृषि विस्‍तारक यांनी कृषि मेळावा आणि कृषि प्रदर्शनीचा आवश्य लाभ घ्‍यावा, असे आवाहन विस्‍तार शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, आत्‍मा संचालक श्री दशरथ तांभाळे, समन्‍वयक अधिकारी डॉ राजेश कदम, डॉ प्रशांत देशमुख, विभागीय कृषि सहसंचालक श्री साहेबराव दिवेकर, श्री तुकाराम मोटे, श्री संतोष आळसे, डीआरडीएचे प्रकल्‍प संचालक श्रीमती रश्‍मी खांंडेकर आदीसह आयोजक समितीने केले आहे.