Tuesday, September 26, 2023

विद्यार्थ्‍यांनी परिश्रमात चिकाटी व सातत्‍य ठेवल्‍यास यश प्राप्‍त होतेच ..... कुलगुरू मा डॉ. इन्‍द्र मणि

वनामकृविच्‍या बदनापूर कृषी महाविद्यालयात नुतन प्रवेशित विद्यार्थ्‍यांचा अभिमुखता कार्यक्रम व विद्यार्थी पालक मेळावा संपन्न

विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करून त्याच्या संपादनासाठी परिश्रमामध्ये चिकाटी व सातत्य ठेवणे आवश्यक आहे. विद्यार्थ्‍यांनी महाविद्यालयीन जीवनाचा सदोपयोग यश संपादन करण्यासाठी करून घ्यावा, असा सल्‍ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ. इन्‍द्र मणि यांनी केले.

विद्यापीठांतर्गत बदनापुर येथील कृषी महाविद्यालयात दिनांक २५ सप्टेंबर प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित अभिमुखता कार्यक्रम व विद्यार्थी पालक मेळाव्याच्‍या अध्यक्षस्‍थानावरून ते बोलत होते.

कुलगुरू मा डॉ. इन्‍द्र मणि पुढे म्हणाले की, पालकांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक क्षेत्र निवडतांना आपल्‍या पाल्‍यास स्वातंत्र्य द्यावे, अभ्यासक्रमाच्या बाबत जागरूक राहावे. कृषी महाविद्यालय, बदनापूर व विद्यापीठ नेहमीच शैक्षणिक सुविधांसोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे ते म्‍हणाले. यावेळी त्‍यांनी कृषी पदवीच्या शिक्षणानंतर विद्यार्थ्यांना उपलब्ध असलेल्या विविध संधीबाबत पण कुलगुरूंनी विद्यार्थ्यांना अवगत करून दिले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविककात सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ. राकेश अहिरे महाविद्यालयाबद्दल माहिती देऊन विद्यार्थ्याच्या शैक्षणिक प्रगतीसाठी पुढील काळात नवनवीन उपक्रम राबवून शिक्षणाचा दर्जा उंचाविण्यासाठी हे महाविद्यालय प्रयत्‍नशील राहील अशी ग्वाही यांनी दिली.

यावेळी महाविद्यालयात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती असलेली ध्वनीचित्रफीत सादर करण्यात आली. शिक्षण विभाग प्रभारी डॉ. अर्चना चौधरी यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक नियमावलीबद्दल माहिती दिली त्यानंतर बी.एससी. कृषीच्या प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या नवीन विद्यार्थ्यांचे व पालकांचे महाविद्यालयातर्फे स्वागत करण्यात आले. महाविद्यालयातील प्राध्यापकांचा उपस्थितांना परिचय करून देण्यात आला.

यावेळी माननीय कुलगुरू यांच्‍या हस्‍ते नुतनीकृत जिजाऊ मुलींचे वसतीगृहाचे उदघाटन करण्‍यात आले. कार्यक्रमास संचालक शिक्षण तथा अधिष्ठाता (कृषी) डॉ. उदय खोडके, विद्यापीठ अभियंता श्री. दीपक कशाळकर, औरंगाबाद येथील राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाचे सहयोगी संचालक संशोधन डॉ. सूर्यकांत पवार, कृषी संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. किरण जाधव, मोसंबी संशोधन केंद्र बदनापूरचे प्रभारी अधिकारी डॉ. संजय पाटील, कृषी विज्ञान केंद्र बदनापूरचे प्रभारी अधिकारी डॉ. सचिन सोमवंशी, विद्यार्थी पालक प्रतिनिधी सांडू लोखंडे आदीसह कृषी महाविद्यालयाचे प्राध्यापक, अधिकारी व कर्मचारी, विद्यार्थी व त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.






Monday, September 25, 2023

बाजरी पिकाचा पिक पद्धतीत समावेश करावा ...... कुलगुरू मा. डॉ इन्‍द्र मणि

मौजे वरुडी तालुका बदनापूर जिल्हा जालना येथे बाजरी अद्यारेषा पिक प्रात्‍यक्षिकास कुलगुरु मा डॉ. इन्‍द्र मणि यांची भेट

कुलगुरु मा डॉ. इन्‍द्र मणि यांनी दिनांक 2५ सप्‍टेंबर रोजी मौजे वरुडी तालुका बदनापूर जिल्हा जालना येथे बाजरी अद्यारेषा पिक प्रात्‍यक्षिकास भेट दिली. राष्ट्रीय कृषि संशोधन प्रकल्प छत्रपती संभाजी नगर  यांच्यामार्फत वरूडी गावात व परिसरात १०० एकरवर एएचबी १२०० या संकरित बाजरी वाणाचे बियाणे शेतकरी बांधवाना देण्यात आले.

मार्गदर्शनात कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि म्‍हणाले की, २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्‍हणुन साजरे करण्‍यात येत आहे. तृणधान्याचे व विषेशतः बाजरी पिकाचे आहारातील महत्व व हवामान बदलास अनुकूल, कमी पाण्यात, कमी खर्चात, बाजरी हे पिक घेता येते, विद्यापीठ विकसित एएचबी १२०० या वाणामध्ये लोहाचे व जस्तचे प्रमाण अधिक असल्याने आहारात समावेश केल्यास लोहाचे प्रमाण वाढण्यास व प्रतिकारक्षमता वाढण्यास मदत होते. भविष्यात अन्नसुरक्षा बरोबरच पौष्टिक सुरक्षा महत्वाची असल्याचे विशद केले. बाजरी पिकाचा पिक पद्धतीत समावेश करण्याचे देखील त्यांनी शेतकरी बंधू यांना आवाहन केले.

मा.कुलगुरु महोदयांनी उपस्थित शेतकरी यांचा समावेत प्रत्यक्ष पिकाची पाहणी केली व शेतकरी बंधू यांच्याशी चर्चा केली. शेतकर्यांनीही आपल्या शेतावर मोठ्या प्रमाणात बाजरी पिकाखालील क्षेञ व उत्पादन घ्यावे व आहारामध्ये समावेश करावा असे आवाहन मा कुलगुरू यांनी केले. त्यांनी बदनापूर कृषि महाविद्यालयातील ग्रामीण कृषि कार्यानुभवचे विद्यार्थ्‍यांशी चर्चा केली. याप्रसंगी सहयोगी संचालक (संशोधन) डॉ सूर्यकांत पवार] डॉ दिपक पाटील, डॉ दिलीप हिंगोले, डॉ चंद्रकांत पाटील, डॉ आशिष बागडे, श्री जयकिशन शिंदे, श्री हरिभाऊ शिंदे, कृष्णा शिंदे, बद्रीनाथ शिंदे आदीसह विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.






Friday, September 22, 2023

वैजापुर तालुक्‍यातील शंभर शेतकरी बांधवाच्‍या शेतात वनामकृवि विकसित बाजरी वाणांचे प्रात्‍यक्षिके

मौजे खंडाळा तालुका वैजापूर येथे बाजरी शेती दिन साजरा

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी अंतर्गत औरंगाबाद येथील राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाच्‍या अखिल भारतीय समन्वय प्रकल्पा मार्फत आंतरराष्‍ट्रीय इक्रिसॅट (ICRISAT) संस्था व जोधपुर येथील अखिल भारतीय बाजरी समन्‍वयक प्रकल्प यांच्या संयुक्‍त विद्यामाने औरंगाबाद जिल्‍हयातील वैजापूर तालुक्‍यातील खंडाळा, बाबुळतेल, नायगाव्हण येथे राष्ट्रीय कृषि संशोधन प्रकल्प व कृषि विभाग आत्मा यांच्या मार्फत १०० शेतकरी बांधवांना एएचबी-१२०० संकरित बाजरी वाणचे बियाणे प्रात्‍याक्षिकाकरिता देण्यात आले होते. हा कार्यक्रम माननीय कुलगुरू मा. डॉ. इन्‍द्र मणि व संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला.

दिनांक २१ सप्‍टेंबर रोजी शेती दिनाचे औचित्य साधुन शेतकरी बांधवांना वाणाचे गुणधर्म, लागवड व पिक पद्धती व आहारातील महत्व या  विषयावर चर्चा करण्‍यात आली. सन २०२३ वर्ष संयुक्त राष्ट्र संघटनेने व भारत सरकारने आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे करण्याचे आवाहन केले आहे. त्या अनुषंगाने बाजरी पिकाचा पीक पद्धतीत व आहारात समावेश करून बाजरी पिकाविषयी शेतकऱ्यांना महत्त्व पटवून देण्याच्या दृष्टीने व मूल्यवर्धनाच्या दृष्टीने विद्यापीठाच्या वतीने प्रयत्न चालू आहेत. यादृष्टीने डॉ सूर्यकांत पवार यांनी मार्गदर्शन केले.

इक्रिसॅट आणि वनामकृविच्‍या वतीने बाजरीचा जैवसंपृक्त संकरित वाण एएचबी १२०० (AHB-1200) आणि एएचबी १२६९ (AHB-1269) असुन यात इतर बाजरी वाणाच्‍या तुलनेत लोह व जस्‍ताचे प्रमाण अधिक आहे. एएचबी १२०० यामध्ये लोहाचे प्रमाण ८७ पीपीएम व जस्तचे प्रमाण ३७ पीपीएम आहे त्याच प्रमणे एएचबी १२६९ (AHB-1269) वाण मध्ये लोह ९१ पीपीएम व जस्त ४३ पीपीएम आहे. 

शेती दिन कार्यक्रमास सहयोगी संचालक संशोधन डॉ सूर्यकांत पवार, प्रकल्प उपसंचालक आत्मा श्री अनिल कुलकर्णी श्री तालुका कृषी अधिकारी वैजापूर वेंकट ठक्के, वनस्पती रोग शास्त्रज्ञ डॉ दिलीप हिंगोले, कृषी विद्या तज्ञ डॉ चंद्रकांत पाटील, पीक पैदासकार डॉ आशिष बागडे, कृषी बाजरा संशोधन केंद्राचे श्री एन एन कुंदे, कृषी पर्यवेक्षक श्री विशाल दागोडे, कृषी सहाय्यक श्रीमती जेजुरकर मॅडम, कृषी पर्यवेक्षक श्री दत्ता पुंड शिवूर, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक श्री प्रसाद शिंदे, शेतकरी श्री अशोक पवार, श्रीमती सुनिता अशोक पवार, सुभाष सूर्यवंशी, पांडुरंग सूर्यवंशी, नामदेव सूर्यवंशी, छगन पवार, चंद्रकलाबाई पवार, ज्योती सूर्यवंशी, संजय बागुल, सुदाम पवार, रविंद्र पवार, सुनील पवार, परमेश शेख, राजेंद्र जानराव भगवान सूर्यवंशी, संतोष गाडेकर, लक्ष्मण सूर्यवंशी, पंडित गाडेकर, जिजाबाई सूर्यवंशी, रंजना गायकवाड, ज्ञानेश्वर घोडेकर, अकबर शेख इत्यादी उपस्थित होते. यावेळी शेतकरी बंधू यांनी या वाण विषयी  मनोगत व्यक्त केले.








Thursday, September 14, 2023

वनामकृवित बैल पोळा उत्‍साहात साजरा

 विविध विभागात कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले बैलांची पुजा 






Saturday, September 9, 2023

अन्न पोषण आणि आर्थिक सुरक्षेसाठी भरडधान्य पिके महत्वाची ....... वनामकृविचे कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि

भारतीय श्री अन्न अनुसंधान संस्थान (ICAR-IIMR), हैदराबाद आणि कृषि शास्त्र, अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने भरडधान्य: श्री अन्न या २१ दिवसीय‌ प्रशिक्षणास सुरुवात 

आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्षाचे औचित्य साधुन भाकृअनुप - भारतीय श्री अन्न अनुसंधान संस्थान (ICAR-IIMR), हैदराबाद आणि कृषि शास्त्र, अकोला यांचे संयुक्‍त विद्यमाने भरडधान्य (श्री अन्न): शाश्वत शेती, मूल्यवर्धन, उद्योजकता विकास आणि पोषण सुरक्षा साठीचे आदर्श पीक या एकवीस दिवसीय‌ प्रशिक्षणाचे आयोजन दिनांक ७ सप्‍टेंबर ते २८ सप्‍टेंबर दरम्‍यान करण्‍यात आली असुन दिनांक   सप्टेंबर रोजी प्रशिक्षणाचे उदघाटन झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे उपमहासंचालक (कृषि शिक्षण)  डॉ. आर सी अग्रवाल हे होते तर प्रमुख पाहुणे म्‍हणुन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि हे उपस्थित होते. आयआयएमआरचे संचालक डॉ. तारा सत्यवती, कृषि शास्त्र संस्थापक निखिल यादव व सहसंस्थापक कोमल कुटे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मार्गदर्शनात कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि म्हणाले की, कोरडवाहू क्षेत्र असलेल्या शेतकरी बांधवांना भरडधान्य हे वरदान असून ग्रामीण भागात हे चांगले उत्पादनाचं साधनं ठरतं आहे, यामुळे महिला आणि तरूण वर्गामध्ये उद्योजकता विकासाला चालना मिळाली आहे. देशाच्या अन्न आणि पोषण सुरक्षेमध्ये भरड धान्य मोलाची भूमिका बजावत आहेत. संबंधित संस्थाची प्रशंसा करत ते पुढे म्हणाले की, जागतिक भरडधान्य उत्कृष्टता केंद्र हे विविधता, न्याय, परिवर्तनशीलता आणि आरोग्य या चार उद्देश समोर ठेवून देशभरातील भूक कमी करण्यासाठी सदैव कार्यरत आहे. बदलत्या हवामानानुसार जैवतंत्रज्ञान, निवड पद्धती व संकर निर्मिती या माध्यमातून अधिक उत्पादक क्षमता आणि अधिक गुणवत्ता असणारी विविध भरडधान्य पिके जसे ज्वारी, बाजरी, नाचणी, राळा, वरी, शामुल, कोदरा आदी पिकांच्या विविध वाण विकसित करत आहेत. कृषि शास्त्र, अकोला हे संशोधन ते शेतकरी यांना जोडणारा दुवा म्हणून काम करत आहे.

अध्यक्षीय भाषणात उपमहासंचालक डॉ. आर सी अग्रवाल म्‍हणाले की, देशात विविध प्रकारचे भरडधान्‍य उत्‍पादीत केली जातात. भरडधान्‍य ही आरोग्‍यवर्धक असुन त्‍याचा जनमानसातील आहारात वापर वाढीकरिता प्रयत्‍न करणे गरजेचे आहे.

प्रशिक्षणात देशपातळीवर विविध कृषि विद्यापीठ, संशोधन केंद्र व कृषि संस्‍थेतील पाचशे सहभागी नोंदविला असुन भरडधान्य वाण सुधारणा, मूल्यवर्धन, उद्योजकता विकास‌ आणि विक्री, पौष्टिक गुणधर्म आणि आरोग्य फायदे, बिज उत्पादन केंद्र तसेच संबंधित शेतकरी उत्पादक संस्था आदी बाबी समाविष्ट आहेत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.संगप्पा यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. व्यंकटेश्वरलू रोंडा यांनी केले.